Raj Thackeray And Uddhav Thackeray Reunion At Marathi Vijayi Melava Actor Pranav Raorane Shared Emotional Note
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ‘ठाकरे’ घराण्याचं नाव आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे घराण्यातली तिसरी पिढी सक्रिय आहे. २० वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही मतभेद झाले आणि दोघेही वेगवेगळे झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला रामराम ठोकत स्वत:चा मनसे नावाच्या पक्षाची स्थापना केली.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ची पहिली झलक पाहिली का? रिलीज डेट ठरली
तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा राज आणि उद्धव एकत्र आले आहेत. त्याचं कारण ठरलंय, महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती… हे दोघेही भाऊ मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले असून त्यांनी आम्ही असेच एकत्र राहू असे त्यांनी सुतोवाच देखील केलंय. हा क्षण समस्त मराठी जणांसाठी ‘याचि देही याचि डोळा’ होता. अनेकांना हा क्षण प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला तर काहींना माध्यमातून पाहिला. काल अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या विजयी मेळाव्याला उपस्थिती लावली होती. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर ‘दुनियादारी’ फेम अभिनेत्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
मराठमोळा अभिनेता प्रणव रावराणे याला अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशीच्या ‘दुनियादारी’ चित्रपटातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली आहे. ठाकरे बंधूंच्या कालच्या विजयी मेळाव्यानंतर त्याने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलंय की, “आज साधारण वीस वर्षांपूर्वीचा दिवस आठवला जेव्हा हे भाऊ वेगळे झाले होते… तेव्हा मी काळाचौकी ला राहायचो म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात… कोणाचाच विश्वास बसत नव्हता की ठाकरे बंधू वेगळे होता आहेत. काही वेळाने टीव्ही वर राज साहेबांच भाषण लाईव्ह सुरू झाल… मी, माझी आई, बहीण, शेजारच्या काकी, त्यांचा मुलगा, शेजारची शुभांगी ताई, तिची आई, भाऊ, वहिनी ( गिरणगावात सुखदुःखात कमीत कमी येवढी माणस तरी लगेच जमतात) आणि राज साहेबांनी जाहीर केले “मी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा देतो आहे… “ आणि आमच्या त्या घरातल्या सगळ्या बायका ढसाढसा रडायला लागल्या… जणू काही आपल्याचं घरात ही फूट पडली आहे. तेव्हा कळाल की आपण किती जोडलेले आहोत या कुटुंबाशी. पुन्हा हे दोघे एकत्र येतील बाळासाहेब त्यांना एकत्र आणतील. ही भाबडी आशा होतीच. पण ते घडल नाही.”
हर्षवर्धन राणेने Silaa चित्रपटातील BTS फोटो केले शेअर, कठोर परिश्रम करताना दिसला अभिनेता
“हे दोघ एकत्र यावेत म्हणून काही कार्यकर्ते शिवसैनिक देखील कृष्णकुंजवर गेले होते त्यात माझे वडीलही गेले पण ते मला कधी समजावू शकले नाहीत ते त्यांना काय समजावणार. आणि जे बाळासाहेबांना जमलं नाही ते शिवसैनिकांना काय जमणार होत म्हणा. त्यानंतर च्या प्रत्येक निवडणुकीत मराठी माणसाच झालेल नुकसान बघून नेहमी वाटायचं या भावांनी एकत्र यायला पाहिजे. अस मलाच काय पण आपल्या सख्ख्या भावाशी न बोलणाऱ्या भावांना सुद्धा हे चं वाटायचं. म्हणून ते सुद्धा हे भाऊ एकत्र येण्यासाठी प्रार्थना करताना मी पाहिले आहेत. आणि आज तो दिवस आला जेव्हा हे भाऊ एकत्र आले. आणि असं वाटलं २० वर्षांनी पूर्वी माझ्या घरात माझ्या लोकांसारखी महाराष्ट्रात रडणारी अनेक लोकं आज आनंदाने हसली असतील. हे दृश बघून सुखावली असतील. आणि स्वर्गीय बाळासाहेब ही सुखावले असतील. आता काही दिवस का असेना आम्हा सामान्य मराठी माणसाला एक वेगळाच कॉन्फिडन्स येणार. ते नाही का क्रिकेट खेळताना कितीही मोठा target असला तरी अजून सचिन आहे रे…! किंवा विराट खेळतो आहेना बस… आपण जिंकणार…..! आजही तसंच वाटत आहे आपण जिंकणार…..! फक्त एकच विनंती आहे अमराठी उद्योजकांना किंवा लोकांना मराठीचे धडे देण्यापेक्षा… मराठी माणसाला उद्योजक होण्याचे धडे द्या… बाकीचे आपहूनच होईल… अर्थात हा माझा विचार आहे… असो आपण मात्र आजचा दिवस घरात गोडाच जेवण करून साजरा केला. कारण पाकीट मिळायला मी काही राजकीय कार्यकर्ता नाही….जय महाराष्ट्र…”