भारतीय चित्रपट, त्याचं संगीत आणि भारतीय संगीताची जगभरातील ओळख म्हणजे लता मंगेशकर! (Lata Mangeshkar) लता मंगेशकर म्हणजे एक प्रकारचे विद्यापीठ. ज्यात एकीकडे संगीत कला, गायन आणि पाश्वगायन कौशल्य होतं. त्यांनी त्यांच्या संगीताच्या कारकिर्दीत 36 भाषांमधील 50 हजाराहून अधिक गाण्यांना आवाज दिला. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांचं संगीत क्षेत्रातील योगदान शतकानुशतकं स्मरणात राहील. लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत एक असा टप्पा गाठला आहे, ज्याची पुनरावृत्ती करणं कोणत्याही गायिकेसाठी फार कठीण असेल. लता मंगेशकर त्यांची आज दुसरी पुण्यतिथी. आजच्या दिवशी त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. जाणून घेऊया स्वरसम्राज्ञी लतादीदींचा संगीताचा प्रवास..
[read_also content=”‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ चा अंगावर काटा आणणारा टिझर रिलीज, पुन्हा एकाद अदा दिसणार दमदार भूमिकेत! https://www.navarashtra.com/movies/bastar-the-naxal-story-teaser-adah-sharma-plyaing-leaad-role-of-ips-officer-504939.html”]
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्याचं बालपण संघर्षानं भरलेलं होतं. 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी त्यांना गायन आणि अभिनयाच्या दुनियेत आणलं. पाच भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. आपल्या भावा-बहिणींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी स्वतःला अभ्यासापासून दूर ठेवलं.
लतादीदींनी मराठी संगीत नाटकात काम केलं. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी मोठमोठे कार्यक्रम आणि नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये गाणी गायला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत लताजींनी एकट्या हिंदी भाषेतील 1000 हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
भारतरत्न पुरस्काराने गौरव
लता मंगेशकरांनी संगीत क्षेत्रात एक अढळ असं स्थान निर्माण केलं आहे. कारकिर्दीत लतादीदींना आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने २००१ मध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आतापर्यंत ३ नॅशनल अवॉर्ड, पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण हे पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे. 2007 मध्ये, फ्रेंच सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार (ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर) देऊन गौरव केला. याशिवाय, सप्टेंबर 2019 मध्ये त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त भारत सरकारने त्यांना ‘डॉटर ऑफ द नेशन’ पुरस्कारानं सन्मानित केलं. आज लतादीदींच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देश त्यांची आठवण करत आहे.