अखेर शशांक केतकरच्या प्रयत्नांना यश, BMC ला धन्यवाद तर दिले पण मारला एक पुणेरी टोमणा!
मराठमोळा अभिनेता शशांक केतकर ह्याने ‘होणार सुन मी ह्या घरची’ मालिकेतून विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा शशांक कायमच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता कायमच सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत असतो. शिवाय, अभिनेता अनेकदा फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर असलेल्या कचऱ्यावर भाष्य करताना दिसतो. आता अशातच अभिनेत्याने पुन्हा एकदा मुंबईतल्या गोरेगावमधील फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेर असणाऱ्या कचऱ्याच्या ढीगाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीही अभिनेत्याने फिल्मइंडस्ट्रीच्या गेटवर असलेल्या कचऱ्याचा ढीग पडलेला एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर करत फिल्मसिटीतले घाणीचं साम्राज्य दाखवलं आहे. कचऱ्याच्या ढीगाचा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने त्यावरून मुंबई महानगरपालिकेला चांगलंच खडसावलं आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत अभिनेता म्हणतो, “फिल्मसिटीचा प्रवेशद्वार कधीही मला निराश करत नाही. कचरा उचलणाऱ्या या मातेला आणि उकिरड्यावर असलेल्या या राजमातेला माझा नमस्कार. या राजमातेला आणि कचरा उचलणाऱ्या मातेला वंदन करत आता आपण थोडं फिल्मसिटीच्या आत जाऊ या आणि बघू या आणखी थोडा कचरा.”
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता पुढे म्हणतो, “फिल्मसिटीतल्या ओल्या कचऱ्याच्या या पेट्या आहेत पण त्यात सर्व प्लास्टिकच आहे. कदाचित या प्लास्टिकच्या पिशव्या ओल्या असतील. कचरा बघितलात ? हास्यास्पद आहे ना. गेल्या वेळी मी फिल्मसिटीचा एक व्हिडीओ टाकला होता आणि त्या व्हिडीओनंतर मुंबई महानगरपालिकेने लगेच त्याची दखलही घेतली होती. तिथला तो परिसर स्वच्छही केला. पण, त्यानंतर फिल्मसिटीमध्ये १५ वेळा तरी आलो असेल. परिस्थिती जैसे थेच आहे. त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून तसाच कचरा जमलेला असतो. खूप वाट पाहिली, पण काहीच फरक पडला नाही. म्हणून आजचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा करतोय.”
बिग बॉसने केली प्रेक्षकांची फसवणूक, या आठवड्यात एव्हिक्शनचे नियम बदलले
व्हिडिओमध्ये पुढे अभिनेता म्हणतो, “मुंबई महानगरपालिका तुम्हाला प्रोब्लेम लक्षात येतोय ना ? प्रत्येक भागात कचऱ्याच्या पेट्या ठेवलेल्या आहेत, असं करून मोकळं होऊ नका. आपल्या समोरचं संकट खूप मोठं आहे. आपली लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे कचरा खूप जास्त निर्माण होणार आहे. त्यामुळे अशी खूप घाणरेडी ठिकाणं असणार आहेत. त्यामुळे इथे असे दोन-चार असे तुटलेले डब्बे ठेवण्यापेक्षा जितकी लोकसंख्या, जितका कचरा, तितक्या पेट्या आणि तितकेच प्रामाणिकपणे कचरा गोळा करण्याची ठिकाणी नेमुन द्या. मला माहितीये तुम्ही सांगाल, वरती एका पुलाचं काम सुरू आहे. बाजूला सगळीकडे काम सुरू आहेत. हे सगळं चालू आहे म्हणून आता हा कचरा ही जनता खपवून घेणार नाही. तेव्हा आवारा ते…”
‘पुष्पा 2’ ने बनवले 11 रेकॉर्ड्स, अल्लू अर्जुनने रचला इतिहास
हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शन दिले की, “मला कल्पना आहे की हे एकच ठिकाण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असे हजारो ठिकाणं आहेत. जिथे कचरा जमलेला असतो. बदलाची सुरुवात ही छोट्या छोट्या कारवाईमधूनच होत असते. जर महानगरपालिका आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज आहे तर मग मलाही निर्लज्जासारखं हे पुन्हा पुन्हा निदर्शनास आणून द्यावं लागणार. मी व्हिडिओ बघणाऱ्या जनतेलाही हेच सांगेन… सहन करू नका!!! कचरा दिसेल तिथे व्हिडिओ काढा आणि तुमच्या महानगरपालिकेला सोशल मीडियावर टॅग करा! निदर्शनास आणून द्या. माझं मत वाया गेलं नसेल, अजूनही देश सुधारेल… अशी आशा करतो… सगळे मिळून प्रयत्न करूया… स्वच्छ देश घडवूया…”
अभिनेत्याने पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच तेथील कचरा उचलला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या इन्स्टाग्राम पेजवर कचरा उचलल्याचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिलंय की, “सदर व्हिडिओ मध्ये चित्रनगरीच्या आतील आणि बाहेरील अशी दोन्ही ठिकाणे दर्शवली आहेत. चित्रनगरी हद्दीच्या आतमध्ये चित्रनगरीने नियुक्त केलेल्या कंत्राटाराकडून स्वच्छता करण्यात येते. तर बाहेरील परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छता केली जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता केल्यानंतरची छायाचित्रे सोबत दर्शवली आहेत. संपूर्ण चित्रनगरी परिसरात कायम स्वच्छता राखली जावी, यासाठी दोन्ही प्रशासनामध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर बैठक घेऊन कार्यवाही निश्चित केली जाईल.”