(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
विकी कौशलचा बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून याची वाट पाहत होते. या ट्रेलरमध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या शक्तिशाली भूमिकेत दिसत आहे. ‘छावा’ चित्रपटात शिवाजी महाराजांचे पुत्र शंभाजी महाराज यांची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड कलाकारांच्या सोबतीने मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी देखील दिसणार आहे. लक्ष्मण उतेरकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. हा चित्रपट १४ जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलताना सुव्रत म्हणाला की, “एकतर छत्रपती संभाजी महाराज यांच कार्य जगभरात माहिती व्हायला हवं आणि दुर्दैवाने त्यांचा इतिहास हा लोकांना फारसा माहीत नाही आणि त्यांचा कार्याची महती प्रेक्षकांना समजावी म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांनी यावर चित्रपट करायचा ठरवला आणि मी या चित्रपटाचा एक भाग आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त आनंद देणारी आहे. महाराजांच्या काळातल्या ऐतहासिक चित्रपटात मला काम करण्याची इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे.” असे अभिनेता म्हणाला आहे.
पुढे त्याने सांगितले की, ‘लक्ष्मण सरांसारखा दिग्दर्शक आणि त्यांची काम करण्याची पद्धत कमालीची आहे. हिंदीत मराठीत त्यांनी आजवर जे काम केलं ते उत्कृष्ठ आहे आणि त्यांच्या सोबतीने काम करून अनेक गोष्टी मला शिकता आल्या आहेत. विकी कौशल हा कमालीचा अभिनेता आणि सेटवर प्रचंड मेहनत करून त्याने ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्याच्या सोबतीने काम तर केलं पण अभिनेता म्हणून अनेक गोष्टी त्याचाकडून शिकलो आहे. चित्रपट करताना प्रत्येक सीन करण्यासाठी आम्ही सगळेच रिहर्सल करायचो आणि प्रत्येक कलाकार त्याचा सह कलाकारच्या सीन साठी ( क्यू ) द्यायला उभा राहायचा.’ असे अभिनेत्याने सांगितले.
Chhaava Trailer: अंगावर काटा येईल असा आहे ‘छावा’चा जबरदस्त ट्रेलर; दोन तासांत मिळाले १५ लाख व्ह्यूज!
तसेच सुव्रतने बॅकस्टेज मंडळींचे देखील कौतुक केले आणि तो म्हणाला की, ‘मेकअप, कॉस्ट्यूम, आर्ट सगळ्या टीमने अहो रात्र मेहनत करून चित्रपट तयार केला आहे. रायगडचा सेट एकदा मांडला होता तेव्हा सेटवर फक्त ऐतिहासिक वेशभूषेतील कलाकार सेटवर होते तेव्हा असं वाटलं की आपण खरोखर हा सगळा काळ जगतोय अनुभवतोय. उन्हानाची, कपडेपटाची पर्वा न करता चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने खूप उत्तम काम केलं आणि फक्त भारतात नाही तर जगभरात हा चित्रपट पोहचवा ही माझी इच्छा आहे’. असे मत त्याने स्पष्ट केले आहे. आता सुव्रत “छावा” सिनेमात नक्की काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. सोबतीला सुव्रत त्याचं बहुचर्चित नाटकं “वरवरचे वधू वर” करण्यात सध्या व्यस्त आहे. 2025 मध्ये सुव्रतने अनेक प्रोजेक्ट्स मध्ये देखील दिसणार आहे.