मुस्तफिजुरच्या 'रिलीज'वरून भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये ठिणगी (Photo Credit - X)
नेमकं प्रकरण काय?
बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजुर रहमानला संघातून रिलीज करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे बांगलादेशमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारताच्या या भूमिकेला बांगलादेशचा अपमान मानले जात असून, तिथल्या सरकारने आता थेट आयपीएलवरच निशाणा साधला आहे.
“गुलामगिरीचे दिवस संपले!” – बांगलादेशच्या मंत्र्यांचा इशारा
बांगलादेशचे कायदा आणि न्याय सल्लागार आसिफ नजरुल यांनी फेसबुकवर एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला विनंती केली आहे की, बांगलादेशमध्ये आयपीएल २०२६ चे सर्व कव्हरेज आणि प्रक्षेपण थांबवण्यात यावे.
नजरुल यांनी लिहिले की, “आम्ही कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशी क्रिकेट किंवा क्रिकेटपटूंचा अपमान सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत.”
खेळात राजकारणाची एन्ट्री
या प्रकरणावर बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण सल्लागार सय्यदा रिझवाना हसन यांनीही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “दुर्दैवाने खेळांमध्ये आता राजकारण शिरले आहे. खेळ दोन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी असतात, पण येथे उलट घडताना दिसत आहे.” भारत आणि बांगलादेशमधील सद्यस्थिती पाहता सरकार कायदेशीर बाजू तपासून आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घालण्याबाबत गंभीर विचार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाची (BCB) भूमिका
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी अद्याप या विषयावर अधिकृत भाष्य केलेले नाही. बीसीबीला अद्याप बीसीसीआयकडून कोणताही अधिकृत संदेश मिळालेला नाही. मात्र, सरकारी पातळीवर सुरू असलेल्या हालचाली पाहता, बीसीबी देखील सरकारशी सहमत असल्याचे दिसून येत आहे.






