(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सातारा/तेजस भागवत: आज सातारा जिल्ह्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले यांनी उपस्थिताना संबोधित केले.
आज साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मिलिंद जोशी, मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले आणि अन्य ज्येष्ठ मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहिले आहेत. आज दुपारी हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षयेखाली कवीसमेलन आयोजित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. या वेळी पोलीस बँडने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन मानवंदना दिली. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यावेळी उपस्थित होते.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले, ‘आज सातारा जिल्ह्यात साहित्यिकांचा कुंभमेळा भरला आहे. याचा मला खूप आनंद आहे. आजच्या या संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा मोठा वाटा आहे.’ पुढे बोलताना मंत्री शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले, ‘अखिल भारतीय साहित्य समेलन साताऱ्यात व्हावे यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालयावर होणारे हे पहिले समेलन आहे. माझे वडील छत्रपती अभयसिंहराजे भोसले हे ६६ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यानंतर आज ९९ व्या संमेलनाचा स्वागताध्यक्ष होण्याची संधी मला प्राप्त झाली.”
“सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. मराठेशाही, लष्करात भरती होणारे तरुण अशी या सातारा जिल्ह्याची ओळख आहे. सातारा जिल्ह्याने अनेक साहित्यिक दिले. भाषेसाठी आंदोलन करणारा मी पहिलाच लोकप्रतिनिधी ठरलो. सातारा जिल्हा हे सांस्कृतिक केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहोत,” असे शिवेंद्रराजे सिंह भोसले म्हणाले.






