(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’ यांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरु होत आहे.
१२५व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने डॉ. व्ही. शांताराम यांची कारकीर्द जिथे बहरली त्या कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जानेवारी मध्ये मुंबई व ठाणे येथे होणाऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचा विशेष विभाग असणार आहे तसेच प्रभात चित्र मंडळ आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया या संस्था डॉ. व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांचे विशेष शो आयोजित करणार आहेत.
तसेच या १२५व्या जयंती वर्षानिमित्त गोव्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डॉ. व्ही. शांताराम निर्मित ‘डॉक्टर कोटनीस की अमर कहानी (१९४६)’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि महोत्सवाच्या सांगता समारंभात डॉ. व्ही. शांतारामांचे चित्र असलेल्या पोस्ट स्टॅम्पचे अनावरण करण्यात येणार आहे.
भारतीय सिनेमाच्या घडणीत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. व्ही. शांताराम हे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते अशा तिन्ही भूमिकांमध्ये तितकेच समर्थ होते. त्यांनी चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, ही संकल्पना भारतीय प्रेक्षकांच्या मनात दृढ केली. त्यांच्या चित्रपटांमध्ये स्त्री सक्षमीकरण, सामाजिक विषमता, शिक्षण, न्यायव्यवस्था आणि मानवी मूल्ये यांसारखे विषय नेहमी अग्रस्थानी राहिले.






