(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मराठी मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या आघाडीच्या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सन मराठी वाहिनीवर डिसेंबर महिन्यात मी संसार माझा रेखिते ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेचा प्रोमो पाहून आणि या मालिकेतील स्टारकास्ट पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले होते. मात्र मालिका प्रसारित होऊन अजून महिनाही झालेला नाहिये.. त्याआधीच ही मालिका बंद करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली आहे. नुकताच मालिकेतील एक प्रोमोवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
मी संसार माझा रेखिते या मालिकेत नवऱ्याचा जाच, सासूचा छळ या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर तिच्या नवऱ्याची भूमिका हरिश दुधाडे साकारत आहे.
मी संसार माझा रेखिते या मालिकेचा एक प्रोमो सन मराठीने शेअर केला आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे. बायको अनुप्रिया दुसऱ्या पुरूषाचं कौतुक करते म्हणून अविनाशने तिची रागात मान धरून… तिला जबरदस्ती टोपभर बासुंदी प्यायला लावतो. हा प्रोमो पाहून प्रेक्षक भयंकर संतापले आहेत. या यावर “आजच्या काळात हे काय दाखवताय, अतिरेक होतोय” अशा कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत.
याच पाठोपाठ आता ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये अविनाश आपल्या बायकोच्या कपाळावर स्केच पेनने ‘निर्लज्ज’ असं लिहितो, असा धक्कादायक प्रकार दाखवण्यात आला आहे. हा प्रकार पाहून अनुप्रिया आणि तिच्या मुलीच्या डोळ्यांत अश्रू येतात.
हा सीन समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही या प्रोमोवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या दृश्यावर टीका करत मालिकेतील आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
या दोन्ही प्रोमोखालील कमेंट्समध्ये प्रेक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “कृपया ही मालिका बंद करा, टीआरपीसाठी काहीही दाखवू नका”, “या मालिकेची प्रत्येक जाहीरात डोक्यात जातेय”, “फालतू मालिका आहे, विकृतपणाचा कळस आहे… प्रेक्षकांनी यातून नेमका कोणता आदर्श घ्यायचा?” अशा शब्दांत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.तसेच, “जग कुठे चाललंय आणि हे कुठे अडकले आहेत”, “ही मालिका ताबडतोब बंद झाली पाहिजे”, “आपण काय दाखवत आहोत याचं भान तरी ठेवा”, “सगळा अतिरेक दाखवला आहे, ही फालतू मालिका आहे”, “प्लीज हे सगळं बंद करा, असं पाहून खूप त्रास होतो” अशा असंख्य प्रतिक्रिया या मालिकेच्या प्रोमोवर उमटताना दिसत आहेत.






