Mrinal Kulkarni Praises Ata Thambaycha Naay Movie Shares Post For Whole Team
शिवराज वायचळ दिग्दर्शित ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव स्टारर ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट नुकतंच १ मे रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवसह ओम भूतकर, पर्ण पेठे, आशुतोष गोवारिकर सह मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते. फक्त प्रेक्षक आणि समीक्षकच नाही तर, मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारही चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. चित्रपट रिलीज झाल्यापासून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे कौतुक केले.
दरम्यान, मराठी चित्रपट आणि टिव्ही अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवराज वायचळ, ओंकार गोखले आणि विक्रांत पवार यांच्यासाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. हे सगळेजण विराजस आणि शिवानी यांचे मित्र आहेत. त्यामुळे मृणाल कुलकर्णीनी या कलाकारांचा प्रवास फार आधीपासून पाहिला आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना नकळत त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांची पोस्ट नेमकी काय आहे पाहुयात…
‘जय माताजी लेट्स रॉक’ फुल्ल ऑन फॅमिली ड्रामा, टीकू तलसानिया आजारपणानंतर दिसणार पहिल्यांदाच चित्रपटात
मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट…
प्रिय शिवराज ,ओंकार आणि विकी…
सर्वप्रथम तुमचं अत्यंत मनापासून कौतुक अभिनंदन आणि शुभेच्छा !! गेली २० एक वर्ष मी तुम्हाला अत्यंत जवळून पाहते आहे आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची धडपड तीव्र इच्छा आणि तुमचे अपरिमित कष्ट याची मी साक्षीदार आहे .सुरुवातीपासून जवळजवळ तुमचं सगळं काम मी बघितलं आहे आणि म्हणूनच आज मी म्हणू शकते की आम्हाला तुमचा अत्यंत अभिमान वाटतो !!
“आता थांबायचं नाय” ह्या अप्रतिम चित्रपटाविषयी आत्तापर्यंत लिहून आलेला शब्द न् शब्द खरा ठरेल असा अनुभव काल घेतला आणि हे सगळं आपल्या घरातल्या मुलांनी केलं याचं इतकं मनापासून कौतुक वाटत होतं की चित्रपट बघताना डोळ्यात पाणी येतच होतं पण तुमच्या विचारांनी डोळ्यात आनंदाश्रू येत होते. हे क्षेत्र सोपं नाही याचा अनुभव तुम्ही घेतच आहात.. मात्र आपल्या विषयावर ,तो मांडण्याच्या पद्धतीवर ठाम राहून तुम्ही इतकी मोठी मोट बांधलीत ! झी स्टुडिओज तुमच्या पाठीशी उभे राहिले आणि आज सगळी प्रसार माध्यम तुमचं भरभरून कौतुक करत आहेत.. तुमच्याबद्दल भरभरून लिहीत आहेत. विराजस आणि शिवानी चे मित्र एवढेच आपलं नातं नाही हे तुम्हाला माहितीये.. आणि त्यामुळेच तुमचं पोटभर कौतुक करण्याची ही संधी मी बिलकुल सोडत नाही ! माणूस चांगला असतो हे आवर्जून सांगण्याची अत्यंत आवश्यकता असलेल्या काळात हा चित्रपट तुम्ही बनवला याचा विशेष आनंद होतो. हा विषय मांडण्यासाठी कसलेल्या कलाकारांनी तुम्हाला मनापासून साथ दिली यातच सगळं आलं !!
तुम्ही बिलकुल थांबणार नाही आणि उत्तरोत्तर अधिकाधिक उत्तम काम कराल याची आम्हाला खात्री आहे !!! खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा!!