फोटो सौजन्य - Social Media
रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण आहे. आई-वडीलांच्या देहत्यागानंतर मुक्ताईंनी आपल्या मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले आणि प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने दटावले देखील. निवृत्ती महाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते. या चारही भावंडांच्या चरित्रात पावलो पावली बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा प्रत्यय देणारे प्रसंग दिसतात. प्रत्येक प्रसंगात मुक्ताई आणि तिचे तीनही भाऊ एकमेकांना सांभाळताना, जपताना दिसतात.
उदाहरणार्थ, मुक्ताईच्या अपमानामुळे व्यथित न होता तुच्या शब्दाचे रक्षण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीची लाही लाही करून मांडे भाजले. गावात होणाऱ्या अपमानामुळे दुःखी झालेल्या ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला लावून ज्ञानेश्वरी लिहायला प्रेरणा मुक्ताईने दिली. हीच कथा वेळोवेळी मुक्ताईला आध्यात्मिक बाबतीत महत्त्व देणाऱ्या तिच्या गुरुबंधू निवृत्तीनाथांच्या बाबतीतही पहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांचे आणि मुक्ताईचे नाते कोणत्याही काळाच्या पलीकडचे, लोभसवाणे असे होते.
याच विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या निरागस, निष्पाप आणि पवित्र नात्याचा उलगडा दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” या चित्रपटात होताना दिसणार आहे. माउली ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई या भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध उलगडणारे आकर्षक पोस्टर रक्षाबंधनाच्या मंगल दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट नववर्षारंभी ३ जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी, निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहेत.
या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए. फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे, तर संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे यांनी केले आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांनी घेतली आहेत. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर, ध्वनीसंयोजन निखिल लांजेकर, पार्श्वसंगीत शंतनू पांडे आणि साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत, आणि केतकी गद्रे अभ्यंकर चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत.