मुंबई: कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईनं (Lawrence Bishnoi) सलमानला जीवे मारण्याची धमकी (Threatening To Salman Khan) दिली होती. त्यामुळं सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती. दरम्यान काल लॉरेन्स बिष्णोई गँगनं सलमान खानला मेल केल्याचे समोर आलं होतं. सलमानच्या टीमनं वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. सलमानला जीवे मारण्याची धमकी देणार्या मेलमुळे सलमानच्या कुटुंबियांसह मुंबई पोलिसांचीही (Mumbai Police Security)झोप उडाली आहे. त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
मॅनेजरला धमकीचा ईमेल
सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकरला एक धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. ज्यात सलमानसोबत बोलणी करण्याची मागणी करण्यात आली. रोहित गर्ग नावाने हा ईमेल करण्यात आला आहे. ईमेलमध्ये लिहिलं आहे की, गोल्डीला तुझा बॉस सलमान खानसोबत बोलायचं आहे. त्याने मुलाखत बघितलीच असेल. नसेल बघितली तर त्याला बघायला सांग. मॅटर क्लोज करायचा असेल तर बोलणी होऊ देत. समोरासमोर बोलायचं असेल तर तसही सांग. अजुन वेळ आहे म्हणून कळवलं आहे. पुढच्या वेळी मोठा झटका मिळेल. ई मेल मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार करण्यात आली. त्यानंतर सलमानच्या घराजवळ म्हणजे गॅलॅक्सीजवळ पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली.
जेलमधून धमकी
याआधीही सलमानला अशी धमकी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोईने जेलमधून सलमानला धमकी दिली होती. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्याने म्हटलं की, काळवीट प्रकरणात सलमानने माफी मागायला हवी, नाहीतर परिणाम वाईट होतील. संपूर्ण समाजाची सलमानने माफी मागावी, असं बिष्णोईचं म्हणणं आहे. मला या प्रकरणात लहानपणापासून सलमानवर राग आहे. त्याने माझ्या समाजातील सदस्यांना पैसे खिलवण्याचा प्रयत्न केला होता.
या धमकीमुळे सलमान खानच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि त्याच्या टीम मध्ये सध्या खूप गंभीर वातावरण आहे आणि त्याच्या सुरक्षेबाबत खूप सगळ्यानांच काळजी आहे.
प्रमोशनवर फिरणार पाणी
सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. प्रमोशन सहसा चित्रपटाच्या रिलीजच्या सुमारे एक महिना आधी सुरू होते, ज्या दरम्यान अधिक सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते. पोलिसांनी सलमान खानला त्याच्या सुरक्षेचा विचार करून त्याचे वेळापत्रक बदलण्याचा सल्ला दिला आहे.