शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचे कौतुक केल्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप आणि कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे सत्कारासाठी एकाच मंचावर उपस्थित राहल्यामुळे राज्यामध्ये राजकारण तापले आहे. दरम्यान, राजन साळवी यांनी ठाकरे गटाला धक्का देऊन शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. यावरुन आता राजकारण रंगले असून ठाकरे गटाचे नेते पुन्हा एकदा युती मजुबत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी आदित्य ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली असून अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकीच्या संबंधित चर्चा करणार असल्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन्ही राज्याच्या निवडणुकीमध्ये एक साम्य आहे जे जिंकले आहेत त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने काम केले आहे. आम्ही भाजपच्या वतीने आयोगाचे आभार मानतो आहे. मात्र निवडणुकीमध्ये आणि मतदानामध्ये झालेला घोटाळा हा जगासमोर आणण्याची गरज आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “देशामध्ये पारदर्शी पद्धतीने निवडणूका होण्याची गरज आहे. ते सध्या होत नाहीत. ईव्हीएम मशीनबाबत निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. 47 लाख मतदार हे अचानक वाढले आहेत. याबाबत त्यांनी उत्तर द्यावे. आमचे काही उमेदवार पडले किंवा निवडणूक आयोगाने ते पाडले हे आम्हाला सांगावं,” असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. याबाबत उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना घेऊन जायचं असेल तर जाऊ द्या. पण वचनं पूर्ण करा, अशी यांची नीती आहे,” असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्लीमध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्यामुळे देखील ठाकरे गट नाराज झाला आहे. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, “कोणी कोणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काल संजय राऊतांनी त्यांना उत्तर दिलं आहे. ज्या एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत नाही तर महाराष्ट्रासोबत गद्दारी केली. अनेक जण पक्ष सोडून जात असतात. पण यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाला दिलेले नाव आणि चिन्ह चोरण्याचं काम केलं याचा आम्हाला राग आहे. हे त्यांनी पाप केलं आहे. जे महाराष्ट्राला लुटतात आम्ही त्यांचं कौतुक केलेले नाही,” असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.