विंटेज राजकीय नेते हे जुन्या गाड्यांप्रमाणे वय झाल्यानंतर जास्त चर्चेत राहतात (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. आचारसंहिताही लागू झाली आहे. आज होत असलेल्या महापालिका मतदानानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. महापालिका निवडणुकीचे काय निकाल लागतात? यावर झेडपीचे राजकीय गणित ठरणार असल्याने राजकीय वर्तुळाचे महापालिका निकालाकडे लक्ष असणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ५ फेब्रुवारीला मतदान होणार, तर ७ फेब्रुवारीला निकाल घोषित करण्यात येणार आहे. या घोषणेसोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली. नऊ वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीयराज संपुष्टात येणार आहे. जिल्ह्यात अंधारी या नव्या गटाची भर पडल्याने गटांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. त्यानुसार ६३ गट आणि १२६ गणांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
अध्यक्षपदासाठी सर्वाधिक चुरस
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पैठण, कन्नड, सिल्लोड, वैजापूर तसेच छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) या विधानसभा मतदारसंघांचे आमदार शिंदेसेनेचे आहेत, तर गंगापूर-खुलताबाद व फुलंब्री या मतदारसंघाचे आमदार भाजपचे आहेत. आपल्याच मतदारसंघातील कार्यकर्त्यास अध्यक्षपद मिळावे यासाठी शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, रमेश बोरणारे, संजना जाधव, अब्दुल सत्तार, पालकमंत्री संजय शिरसाट, भाजपचे आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील काही तुल्यबळ उमेदवारही स्पर्धेत असल्याचेही बोलले जात आहे.
तीन वर्षांपासून जिल्हा परिषद कार्यकारिणीविना
२०१२ ते २०१७ या पंचवार्षिक कालावधीत सिल्लोड तालुक्यातील भराडी गटाचे श्रीराम महाजन जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यानंतर अॅड. देवयानी डोणगावकर आणि मीना शेळके यांनी अध्यक्षपद भूषवले. मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद कार्यकारिणीविना असून, प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आणि यंदा अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
आजी-माजी पदाधिकाऱ्यांना विशेष रस
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. सलग ९ वर्षे कारभाऱ्यांशिवाय असलेल्या झेडपीच्या आता राजकीय चुरस होणार आहे. यात सदस्यपद आणि सभापतीसह अध्यक्षपदासाठी सर्वाधिक रस्सीखेच पाहायला मिळेल.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Election 2026 : “सकाळी 4 वाजता फोन…, भाजपने पैशाचा पाऊस पाडला”, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप






