कुटुंब म्हणून आम्ही एकच (सौजन्य - नवराष्ट्र टीम)
मुंबई : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील राजकीय मतभेद आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रमुख नेते शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर जनतेला काय फायदा होईल? वास्तवात, शरद पवार आणि अजित पवार कधीच वेगळे झाले नव्हते. हे केवळ एक ढोंग आहे’, असे बच्चू कडू म्हणाले.
प्रहारतर्फे सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडल्याचे म्हणत ‘प्रहार कार्यकर्त्यांसाठी निवडणुका आणि राजकारण हे प्राधान्य नाही. सार्वजनिक काम हे आमचे प्राधान्य आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमी भाव आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता सरकार याबाबत बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही अर्थमंत्री अजित पवार यांच्या बारामती ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरपर्यंत मोर्चा काढू. ही चळवळ 2 जूनपासून सुरू होईल’, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरकारने आमच्याकडून घेतलेले पैसे शेतकरी कर्जमाफीच्या स्वरूपात परत करावेत’, अशी मागणीही कडू यांनी यावेळी केली. तसेच कर्जमाफीसाठी 35 ते 40 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी आम्ही झांज वाजवून निषेध करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दोन्ही नेते एकत्र येण्याची जोरदार चर्चा
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.