प्रहार नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रायगडावर अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे (फोटो - सोशल मीडिया)
अमरावती : राज्यामध्ये धुलिवंदन सणाची धुमाळी सुरु आहे. राजकीय वर्तुळामध्ये देखील याचा मोठा उत्साह दिसत असून नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. ‘बुरा नो मानो होली है’ म्हणत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी निशाणा साधला होता. तसेच कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आमच्यासोबत युती करा अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद देतो अशी ऑफर देखील नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिली. यावर आता बच्चू कडू यांनी कॉंग्रेस नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
होळीच्या निमित्ताने काँग्रेसचे बडे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. त्याची राज्यभर एकच चर्चा रंगली. आपला राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे या दोघांनी काँग्रेससोबत यावे, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. त्या दोघांनी अर्धा-अर्धा कालावधी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी अशी ही ऑफर होती. त्यांनी होळीच्या निमित्ताने ही खास ऑफर दिली. यावरुन आता जोरदार राजकारण रंगले असून जोरदार प्रतिक्रिया देखील येत आहेत.
काय म्हणाले बच्चू कडू?
प्रहार संघटनेचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. बच्चू कडू म्हणाले की, नानाभाऊंची ही ऑफरच मोठी हास्यास्पद आहे. काँग्रेसच सध्या स्थिर आहे की नाही हे समजत नाही. काँग्रेसचे 20 आमदार आहेत, तर एक तर आताच शिंदे गटात गेले आहेत. नाना पटोले यांची ऑफर चांगली आहे. पण त्यांनी काँग्रेस कुठंय ते शोधलं पाहिजे असा खोचक टोला बच्चू क़डू यांनी नाना पटोले यांना लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले, जोपर्यंत केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, तोपर्यंत खाली कोणी हालणार नाही. कारण ईडीचे जे फटके आहेत, त्याची या सर्वांनाच भीती आहे, त्यामुळे काँग्रेसची ऑफर स्वीकारण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा चिमटा बच्चू कडू यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बच्चू कडू म्हणाले की, धर्माच्या राजकारणामध्ये आघाडी असो किंवा युती असो, यांनी शेतकर्यांना चकनाचुर करून टाकलं, यांच्या रंगपंचमीमध्ये आमची रंगपंचमी लाल होतय, काळी गर्द झालेली आहे, असे आपबित्ती बच्चू कडू यांनी विषद केली. नेत्याच्या अंगावरचे कपडे असू देत किंवा पक्षाचे झेंडे असू देत, तो सगळा कापूस शेतातून आलेला आहे, तो शेतकरी मारला जातो, धर्माच्या नावावर मारला जातो, कधी फतवा काढून, तर कधी कटेंगे तो बटेंगे म्हणून हिंदू शेतकरीच मारतो, याच्यामध्ये हिंदू शेतकरीच करतो, सरकार दिलेल्या शब्द पाडत नाही, कर्जमाफीची घोषणा केली परंतु मुख्यमंत्र्यांना ती आठवत नाही. अजित पवारांची आणि एकनाथ शिंदे यांची स्मरण शक्ती हरवल्याचा टोला बच्चू कडू यांनी लगावला.