विधान परिषद निवडणुकीवरून मविआ मध्येच वादंग! बाळासाहेब थोरात सुप्रिया सुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून भडकले...
राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहू लागले आहेत. १८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकांआधीच महायुतीने १७ पैकी ८ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी या ८ जागांवरून निवडणूक अर्ज माघारी घेतल्याने महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.यावरूनच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
पुणे आणि नाशिक विधानपरिषद निवडणुकीतुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या माघारीवरून काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात संतप्त झाल्याचे दिसत आहेत. त्यातच आता ‘मतांची बेरीज नसेल तर कशाला लढायचे, असं म्हणणारे सुद्धा आमच्यात आहेत,” असा खोचक टोला त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत वाद सुरु झाल्याचे दिसत आहे.
सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद निवडणुकीतील वाढत्या भ्रष्टाचारावर भाष्य केले होते. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “सध्याच्या विधान परिषद निवडणुकीत कोणतीही रंगात दिसत नाही. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे यात लोकशाहीचा उत्साह नाही. तर प्रचंड प्रमाणावर घोडेबाजार सुरु आहे. हा घोडेबाजार होणार हे स्पष्ट असल्यामुळे पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून महाविकास आघाडीने माघार घेतली आहे,” असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता काँग्रेसने याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षरीत्या आक्षेप घेतला आहे. नाशिकमध्ये बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले,” महाविकास आघाडीत अर्ज माघारीनंतर नाराजी नाटक आहे. मात्र, लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या मार्गावर अवलंबून भाजपाने अनेकांना माघार घ्यायला लावल्याचं दिसून आलं आहे. मतांची बेरीज नाही तर कशाला लढायचं? असं म्हणणारे सुद्धा आमच्यात आहेत,” असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवर अप्रत्यक्ष टीका केली. बाळासाहेब थोरातांच्या या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडी मधील वाद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुणे विधानपरिषद मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने पुण्यातील निवडणूक बिनविरोध पार पडली. यावरूनच आता पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.
ते म्हणाले, “”विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेण्याबाबत चर्चा झाली असेल तर ती आमच्यापर्यंत का पोहोचली नाही. आमच्या वरिष्ठांना देखील याबाबत काहीही माहिती नव्हती. राष्ट्रवादीने आम्हाला दोन वेळा दगा दिला. एकदा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आणि आता विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने दगा दिला. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि भाजपची आतून छुपी युती होती का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
‘शरद पवार गटाने दोनवेळा दगा दिला,’ पुणे विधानपरिषद निवडणूक माघारीवरून वसंत मोरे भडकले






