संजय राऊतांचे महायुतीवर गंभीर आरोप; भाजपचा पलटवार
विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडणुक अर्ज माघारी घेतल्याने १७ पैकी ५ जागा महायुतीने बिनविरोध मिळवल्याचे दिसत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून निवडणुका बिनविरोध करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे खळबळजनक आरोप त्यांनी केले आहेत.
कोकण विधान परिषद मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी मंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज मागे घेतला. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देवयानी डोणगावकर यांनीदेखील अर्ज मागे घेतला. अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या असून शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि एका जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे. यावरूनच आता संजय राऊत यांनी महायुती सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून यावर भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले! विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे, कोकण, छ.संभाजी नगर, पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत,” अश्या शब्दात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
वि.परिषद निवडणूक:
काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान १५० कोटी रुपये खर्च झाले!
विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले महाराष्ट्रात यासाठी प्रचंड पैसा आहे,
कोकण
छ.संभाजी नगर
पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत pic.twitter.com/G67c6TLnG8 — Sanjay Raut (@rautsanjay61) June 5, 2026
संजय राऊत यांच्या आरोपानंतर भाजनेसुद्धा पलटवार केला आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बण यांनी संजय राऊतांच्या ट्विटला प्रत्युत्तर देत म्हंटले कि, “जनाब संजय राऊत, माणसं सांभाळायला पैसे लागत नाही तर प्रेम लागतं. पण राऊत आणि त्यांच्या पक्षाला ना कार्यकर्ते सांभाळता आले, ना नेते टिकवता आले. कार्यकर्त्यांनी साथ सोडली, नेत्यांनी पक्ष सोडला आणि आता त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत.”
जनाब संजय राऊत,
माणसं सांभाळायला पैसे लागत नाही तर प्रेम लागतं. पण राऊत आणि त्यांच्या पक्षाला ना कार्यकर्ते सांभाळता आले, ना नेते टिकवता आले. कार्यकर्त्यांनी साथ सोडली, नेत्यांनी पक्ष सोडला आणि आता त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. विधान परिषद… https://t.co/TLlWIY5zI5 — Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) June 5, 2026
ते पुढे म्हणाले, “विधान परिषद निवडणुकीत १५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा खोटा आरोप केला आहे. पण नाशिकचे संपर्क प्रमुख म्हणून उबाठा गटाला साधा उमेदवारही देता आला नाही. त्यामुळे इतरांवर खोटे आरोप करण्यापूर्वी नाशिकमध्ये नेमके काय व्यवहार झाले? नाशिकच्या दौऱ्यांमध्ये राऊतांनी किती बॅगा भरून घरी आणल्या? उमेदवार का दिला नाही? याचं उत्तर राऊतांनी पत्रकार परिषदेत द्यावं. ज्यांच्या स्वतःच्या पक्षात उमेदवार उभा करण्याची ताकद नाही, त्यांनी लोकशाहीच्या नावाने आरोपांची खोटी आतषबाजी करू नये,” अशा शब्दांत त्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.






