उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटीवर नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर : राज्यामध्ये विविध राजकीय विषयांवरुन जोरदार राजकारण रंगले आहे. तसेच राज्याचे हिवाळी अधिवेशन देखील सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे वादंग निर्माण झाले आहेत. सत्ताधारी व विरोधी नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. निवडणुकीदरम्यान, दिलेल्या आश्वासनांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. सध्या राजकीय वर्तुळामध्ये उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची जोरदार चर्चा रंगली आहे.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे अधिवेशनासाठी हजर झाले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीने निशाणा साधला. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांची नागपूरमध्ये भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली. मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेत्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशन संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. सुसंस्कृत राजकारण आपल्याला पुढे चालवायचं आहे. पाच वर्षे एकत्र काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण करायचं आहे. कोणतीही टोकाची भूमिका व मतं असली तरी आमच्यात शत्रूत्व नाही,” असे सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेऊन, त्यांचे अभिनंदन केले.
ह्यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार… pic.twitter.com/rM7EpuTgVu— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 17, 2024
देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर शिंदे गटाच्या नेत्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट मत मांडले आहे. संजय शिरसाट म्हणाले आहेत की, “राजकारणाचा भाग सोडा, उद्धव ठाकरेंनी समंजसपणा दाखवला ते कौतुकास्पद आहे. असा समंजसपणा त्यांनी याआधी दाखवला असता तर आज वेगळं राजकीय चित्र वेगळं असतं, असं मंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट म्हणाले. राजकारणात असं सर्वांना सांभाळून राहावं लागेल ही गोष्ट ठाकरेंना समजली असेल,” अशा खोचक शब्दांत संजय शिरसाट यांनी टोला लगावला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या चर्चेत असलेल्या फडणवीस व ठाकरेंच्या भेटीवर भाजप नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. “विरोधी पक्षातील लोक अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना भेटत असतात. या भेटीचे वेगळे अर्थ काढू नये. माझी आणि उद्धव ठाकरे यांची देखील मघाशी भेट झाली. ही आपली राजकीय संस्कृती आहे. आम्ही विरोधक आहोत वैरी नाही. आमचे राजकारणाबाहेर जिव्हाळ्याचे संबंध आहेत,” असे मत प्रवीण दरेकर यांनी मांडले आहे.