बृजभूषण शरण सिंह यांची राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर जोरदार विरोध करण्यात आल्यानंतर हिंदी भाषा ही पर्यायी भाषा म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याला मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तीव्र विरोध केला. यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी देखील वादग्रस्त विधान केले आहे. मराठी हिंदीच्या या प्रकरणामध्ये आता भाजप माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी देखील उडी घेतली आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी अस्मिता दुखावेल अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. यामुळे जोरदार वाद निर्माण झाला. निशिकांत दुबे यांच्याविरोधात महाराष्ट्रामधून संतापाची लाट उसळली होती. निशिकांत दुबे यांनी राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंना थेट आव्हान दिले होते. त्यानंतर आता भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी देखील या वादामध्ये उडी घेत राज ठाकरेंना आव्हान दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्रातील मराठी आणि अमराठी वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. भाषा जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही. मी राज ठाकरे यांना सांगू इच्छितो की तुमच्या या कृतीमुळे उत्तर भारतीयांचं आणि महाराष्ट्राचं नातं तुटणार नाही. मी त्यांना सांगतो की त्यांनी वाचलं पाहिजे. कदाचित ते लिहित-वाचत नसतील. छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा औरंगजेबाने कैद केलेलं होतं, तेव्हा त्यांना कैदेतून मुक्त करण्याचं काम आग्यातील आमच्या व्यापाऱ्यांनी केलं होतं”, असं ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले आहेत.
उत्तर भारतीयांना मारहाण करतात हे योग्य नाही
भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, “राज ठाकरेंना हेच सांगू इच्छितो की त्यांनी थोडं वाचन करावं. आज तुम्हाला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो, त्या अभिमानाच्या इतिहासासाठी उत्तर भारतीयांनी देखील घाम गाळलेला आहे. खरं तर राज ठाकरे खूप खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत. जेव्हा राज ठाकरे अयोध्येत येणार होते, तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं होतं की मी त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरे हे देखील कुठेतरी अयोध्येशी जुडलेले आहेत. तरीही त्यांचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना मारहाण करतात हे योग्य नाही,’ असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तर राज ठाकरेंना ते झेपणार नाही
पुढे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना थेट आव्हान देखील दिले आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे अयोध्येत आले नाहीत. पण त्यानंतर आता राज ठाकरेंनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे आता उत्तर भारतातील तरुणांमध्ये त्यांच्याबाबत रोष आहे. ते एवढे संतापलेले आहेत की यांच्यापैकी कोणाला आव्हान दिलं की चला राज ठाकरेंच्या भेटीला जायचं, तर राज ठाकरेंना ते झेपणार नाही. त्यामुळे मी हे जबाबदारीने सांगतो की राजकारण करायचं तर करा. पण भाषा, जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करू नका,” असं भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.