कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोहन भागवत व पंतप्रधान मोदी यांच्या निवृत्तीवर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
PM Modi Retirement : मुंबई : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. याचे कारण म्हणजे भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या प्रमुखांनी केलेले वक्तव्य आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी निवृत्तीबाबत सूचक वक्तव्य केले. यावरुन मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्तीची आठवण करुन दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. यावरुन आता कॉंग्रेसने देखील भाजप पक्षाला आणि आरएसएसला डिवचले आहे.
एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी रिटायरमेंटच्या वयाबाबत वक्तव्य केले होते. पच्चाहत्तरची शाल अंगावर आली की थांबायचं असतं असे सूचक विधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील वय आता 75 होणार आहे. मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या रिटायरमेंटची जाणीव करुन देत असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. यानंतर आता कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, “पाच दिवसांचा राजकीय परदेश दौरा आपटून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतामध्ये आले. मात्र ही त्यांची कोणती ‘घरवापसी’ आहे. बिचारे पंतप्रधान मोदी हे पुरस्कार जिंकून भारतामध्ये आले. आणि बघा कशा पद्धतीने त्यांचे देशामध्ये स्वागत केले जात आहे. पंतप्रधान मोदी भारतामध्ये परताच त्यांना सरसंघचालकांनी निवृत्तीची आठवण करुन दिली आहे. ते येत्या 17 सप्टेंबर 2025 रोजी 75 वर्षांचे होत आहेत,” असा टोला जयराम रमेश यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, “याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सरसंघचालकांना आठवण करुन देऊ शकतात की ते देखील येत्या 11 सप्टेंबर रोजी मोहन भागवत हे देखील 75 वर्षांचे होणार आहे. एका दगडात दोन पक्षी! अशा शब्दांत कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. त्याचबरोबर कॉंग्रेस नेते पवन खेरा यांनी देखील मोदींवर निशाणा साधला आहे. आता दोघांनी झोळ्या उचल्या आणि एकमेकांना मार्गदर्शन करायाला जा,” असा खोचक टोला कॉंग्रेस नेते पवन खेरा यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “आपल्याला आठवत असेल मी या संदर्भात एक रोखठोक लिहिलेल होत, नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम, आणि संघाचे सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ही चर्चा साधारण त्याचा सारांश मी दाखवला. त्यांच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वतःच नियम केला, संघाने नियम केला 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी. सत्तेच्या पदावरून नरेंद्र मोदी यांनी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी आपल्या मार्ग मोकळे करण्यासाठी लादली,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.