ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपने धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवली 'ही' महत्त्वाची जबाबदारी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. या संदर्भात, गुरुवारी पक्षाने आपले निवडणूक प्रभारी आणि सह-प्रभारी जाहीर केले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बिहारमध्ये राज्य निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर, केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांना राज्य निवडणुकांचे सह-प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना राज्य निवडणूक सह-प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा ऑक्टोबरमध्ये जाहीर केल्या जातील, अशी शक्यता आहे. तत्पूर्वीच भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार, भाजपने बिहार आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांसाठी निवडणूक प्रभारी नियुक्त केले आहेत.
हेदेखील वाचा : पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार
भाजपने पक्षाचे नेते बैजयंत पांडा यांना तामिळनाडू निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. मुरलीधर मोहोळ यांना निवडणूक सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. याव्यतिरिक्त, भाजपने पक्षाचे नेते धर्मेंद्र प्रधान यांना बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. पक्षाचे सीआर पाटील आणि केशव प्रसाद मौर्य यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.
भूपेंद्र यादव यांच्याकडे पश्चिम बंगालची जबाबदारी
तसेच, भाजप नेते भूपेंद्र यादव यांना पश्चिम बंगालसाठी पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. बिप्लब कुमार देब यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.
जागा वाटपाचा ठरला फॉर्म्युला?
बिहारच्या राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच कोणता पक्ष, किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता बिहारमधील आगामी निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यात नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू 102 जागा लढवणार असल्याची माहिती दिली जात आहे.