भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत (फोटो सौजन्य-X)
नवी दिल्ली : लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या. तेव्हापासूनच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात आता भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड 21 जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी होऊ शकते, अशी नवी माहिती समोर आली आहे. तसेच पुढील आठवड्यापासून या दिशेने हालचाली तीव्र होतील, असेही म्हटले आहे.
देशातील सुमारे 10 राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल. त्यानंतर लवकरच राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या अनौपचारिक चर्चेतून स्पष्ट संकेत मिळाले आहेत की, नवीन अध्यक्षांची निवड आता पुढे ढकलली जाणार नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे संघटनेत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया त्यापूर्वी पूर्ण केली जाईल. वास्तविक, जे. पी. नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपला आहे. त्यांचा कार्यकाळ वाढवला जात आहे. त्याचबरोबर ते केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील आहेत, त्यामुळे भाजपा लवकरच नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी करत आहे.
दरम्यान, 15 ऑगस्टनंतर बिहार निवडणुकीबाबत चर्चा सुरू होईल. त्यामुळे बिहारमधील विधानसभा निवडणुकीनंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून भाजप त्यापूर्वी नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडू इच्छिते. पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, दहा राज्य अध्यक्षांच्या निवडीसाठी काम वेगाने सुरू आहे. 21 जूनपर्यंत अनेक राज्यांमध्ये नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.
अध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, दोघांचा अनुभव पाहता धर्मेंद्र प्रधान यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे आता लवकरच भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.