भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेसवर निशाणा साधला. (फोटो - टीम नवराष्ट्र)
सातारा : जातनिहाय जनगणना करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय क्रांतिकारी व ऐतिहासिक आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव सर्व ग्रामपंचायती, बूथ व मंडलामध्ये घेण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले की, “विशेष म्हणजे, महाराष्ट्र दिनाला घोषणा करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या क्रांतिकारी निर्णयाबद्दल महाराष्ट्र भाजपाने राज्यातील एक लाख १८६ बूथ आणि १,२८० मंडल समित्यांसह महाराष्ट्रातील २७ हजार ग्रामपंचायतींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, सर्व मंडल आणि बूथ स्तरापर्यंत अभिनंदनाचे ठराव घेण्याची तयारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे, देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे नवे पर्व जातनिहाय जनगणनेमुळे सुरू होईल. जातनिहाय जनगणना लोकशाही मजबूत करणारा महत्तम टप्पा असून, पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या ध्येयपूर्तीची पाऊलवाट अधिक पक्की होईल, ही खात्री आहे,” असा विश्वास धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारतावर इंग्रजांचे राज्य असताना जातनिहाय जनगणना इंग्रज सरकारने केली होती, त्यानंतर अनेक वेळा फक्त जातीनिहाय जनगणनेच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेस शासनाने एकदाही हा विषय पटलावर घेतला नव्हता, काही राज्यांमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले परंतु जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्याचे धाडस फक्त भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने केले आहे,” असे धैर्यशील कदम म्हणाले आहेत.
“जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेसने जातनिहाय जनगणना प्रत्यक्षात कधीच केली नाही
धैर्यशील कदम पुढे म्हणाले की ,”काँग्रेसने आजवर जातनिहाय जनगणनेला विरोधच केला आहे. स्वातंत्र्यनंतर आजवर योग्य पद्धतीने जातनिहाय जनगणना कधीच झाली नाही. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. २०१० मध्ये त्यावेळचे पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांनी जातनिहाय जनगणने बाबत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असे आश्वासन लोकसभेत दिले होते . त्यानंतर यासाठी मंत्रिमंडळ गटाची स्थापनाही करण्यात आली होती . मात्र या गटातील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी . चिदम्बरम यांनी २०११ मध्ये होणाऱ्या जनगणनेत जात निहाय जनगणना करण्यास विरोध केला होता. जात निहाय जनगणना स्वतंत्रपणे केली जाईल, असे चिदंबरम यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र मनमोहन सिंग यांच्या काँग्रेस सरकारने जात निहाय जनगणना प्रत्यक्षात कधीच केली नाही. या ऐवजी काँग्रेस सरकारने सामाजिक-आर्थिक आणि जात गणना (SECC) केली . त्यासाठी ४८९३ . ६० कोटी इतका खर्च केला. मात्र कोणत्या जातीचे लोकसंख्येतील प्रमाण किती आहे याची आकडेवारी जाहीरच केली नाही. या पाहणीच्या अहवालात विविध प्रकारच्या ८ . १९ कोटी एवढ्या प्रचंड चुका होत्या. याचा अर्थ काँग्रेस सरकारने अनिच्छेने ही पाहणी अक्षरश: उरकली होती,” असा आरोप धैर्यशील कदम यांनी केला आहे.
राज्यांचे सर्वे समाजाची दिशाभूल करणारे
पुढे ते म्हणाले, “काँग्रेस आणि काँग्रेसच्या इंडी आघाडीतील मित्र पक्षांनी या मुद्द्याचा वापर फक्त राजकीय स्वार्थासाठी केला. काही राज्य सरकारांनी जातींची पाहणी (सर्व्हे ) केली आहे. ही पाहणी काही सरकारांनी योग्य पद्धतीने केली आहे , तर काही राज्य सरकारांनी राजकीय हेतूने अपारदर्शक पद्धतीने ही पाहणी केली . असे सर्व्हे समाजाची दिशाभूल करीत आहेत , जनतेत गैरसमज निर्माण करीत आहेत. मोदी सरकारने शास्त्रीय पद्धतीने ही जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. जनगणनेबरोबरच जात निहाय गणना व्हावी अशी भाजपाची भूमिका आहे . २०२१ मध्ये सार्वत्रिक जन गणना कोरोना मुळे होऊ शकली नव्हती. १९५१ ते २०११ या काळात जेवढ्या जन गणना झाल्या त्यात अनुसूचित जाती जमातींची आकडेवारी दिली गेली. मात्र ओबीसी समाजाची आकडेवारी कधीच दिली गेली नाही. हा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष नेते हा आपलाच अजेंडा आहे आणि सरकारवर आमचा दबाव असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असे मत धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पत्रकार परिषदेमध्ये धैर्यशील कदम यांनी सांगितले की, “मंत्रिमंडळाच्या कार्यप्रणालीच्या शंभर दिवसाच्या कामाच्या अवलोकनामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुसरा क्रमांक आलेला आहे. त्याचबरोबर जयकुमार गोरे यांच्या पंचायत राज व ग्राम विकास मंत्रालयाचा चौथा क्रमांक आल्याबद्दल या दोघांचेही अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे उसाच्या एफ आर पी मध्ये प्रतिटन 150 रुपये वाढ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात आले. ”