एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यामध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली (फोटो - सोशल मीडिया)
BJP Thane Meeting : ठाणे : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी मुंबईसह सर्वच महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली. यावेळी भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी दाखवल अब की बार 70 पार असा नारा दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी भाजपनेच जाळे टाकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी भाजपने ग्राऊंड वर्किंग सुरु केले आहे. प्रत्येक भागासाठी सुक्ष्म चर्चा आणि प्लॅनिंग केले जात आहेत. दरम्यान, ठाण्यासाठी देखील भाजप जोरदार आखणी करत असून या संदर्भात भाजपची आढावा झाली आहे. यामध्ये ठाण्यात महापौर हा भाजपाचाच होणार असल्याचा विश्वास देखील भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांसाठी भाजपने हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. यावेळी स्वबळाचा नारा देत अधिकाधिक जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. मात्र यामुळे एकप्रकारे एकनाथ शिंदेंच्या ठाण्याला भाजप सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने पक्ष कार्यालयात अभ्यास वर्गाचे आयोजन केले . या ठिकाणी इच्छुक उमेदवारांचे परिचय पत्र भरून घेण्यात आले. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवकांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभ्यास वर्ग घेण्यात आला. या अभ्यास वर्गात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ठाण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन सांगण्यात आला.
महायुतीचा वाद चव्हाट्यावर
राज्यात सत्तेवर असलेली महायुती एकत्र निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी ठाण्यात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद वारंवार चव्हाट्यावर आले आहेत. वनमंत्री गणेश नाईक हे शिंदे सेनेवर सातत्याने टीका करत आहेत तर खासदार नरेश म्हस्के हे नाईकांना प्रत्त्युत्तर देत आहेत. त्यामुळे ठाण्यातील महायुतीमधील संबंध ताणले गेले आहेत. महापौरपद भाजपाच्या वाट्याला यावे, अशी इच्छा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. तर त्यांना उत्तर देताना उदय सामंत बोलले की काही लोकांनी युतीबद्दल उंची पाहून बोलावं. असे वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये महायुतीत सुरु आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के?
“महायुती म्हणून लोकसभा, विधानसभा लढलो, आता नागरिकांसमोर जाताना ठाणे महापालिकेत युती म्हणून लढावं ही आमची इच्छा आहे. समोरच्याची इच्छा नसेल, तर गेली 10 वर्ष त्याच्याआधी सुद्धा वेगवेगळे लढून एकहाती सत्ता आणतच होतो. त्यामुळे आमची प्रत्येक वॉर्डात तयारी आहे. पण राज्यातील युतीचे नेते जो निर्णय घेतील, त्याचं आम्ही पालन करु“ असं ठाण्यातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.