कराड आणि मलकापूर नगरपालिकांमध्ये तिरंगी-चौरंगी लढती; निकाल पुढे ढकलल्याने उमेदवारांची वाढली धाकधूक (फोटो - iStock)
कराड : कराड आणि मलकापूर नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुका इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी पार पडल्या. मात्र, आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नगरपालिकांची मतमोजणी आणि निकाल प्रक्रिया तब्बल 18 दिवस पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे दोन्ही नगरपालिकांच्या नगराध्यक्ष आणि नगरसेव पदाच्या उमेदवारांची धाकधूक प्रचंड वाढली आहे.
मंगळवारी मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला. मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच निवडणूक विभागाने राज्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार असल्याचे घोषित केले. यामुळे बुधवारी (दि.३) होणारी मतमोजणी पुढे ढकलल्याने उमेदवारांसोबतच नागरिकांच्याही अपेक्षांवर विरजण पडले. निवडणूक प्रक्रियेपूर्वी सर्व राजकीय पक्षांनी, स्थानिक आघाड्यांनी आणि अपक्ष उमेदवारांनी प्रभावी प्रचार मोहीम राबवली होती.
तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आजी-माजी मंत्री आणि आमदारांच्या प्रचारसभांमुळे दोन्ही शहरांतील वातावरण तापले होते. त्यामुळे निकालही तातडीने लागावा, अशी जनसामान्यांची अपेक्षा होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेच्या अडथळ्यामुळे मतमोजणी विलंबित झाल्याने उमेदवारांवर मानसिक ताण अधिक वाढला आहे.
हेदेखील वाचा : राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला
मतदानाच्या दोन दिवस आधीच मलकापूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ४ – अ आणि ८ – अ येथील निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेत स्थगित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कराड नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक १५ – ब येथील निवडणूकही स्थगित झाली. या तीनही प्रभागांसाठी शनिवारी (दि.२०) प्रत्यक्ष मतदान, तर रविवारी (दि.२१) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या भागांत सर्वच पक्षांनी पुन्हा आपली ताकद एकवटली असून, मोठी टशन होणार असल्याची चर्चा शहरांत रंगली आहे. यामुळे पुढील १५ दिवस उमेदवारांची धाकधूक आणि मानसिकता ताण वाढणार, हे स्पष्ट होत आहे.
नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीकडे नजरा
कराड नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे विनायक पावसकर, यशवंत व लोकशाही आघाडीचे राजेंद्रसिंह यादव, काँग्रेसचे झाकीर पठाण आणि अपक्ष रणजीत पाटील यांच्या चौरंगी लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे मलकापूर नगरपालिकेत भाजपचे तेजस सोनावले, राष्ट्रवादीचे आर्यन कांबळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) अक्षय मोहिते यांच्यात तिरंगी सामना रंगला आहे. दोन्ही शहरांमध्ये प्रत्येक पक्षाने ‘आपलाच नगराध्यक्ष विजयी होणार’ असा दावा केल्याने मतदारांमध्ये उत्सुकता अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.
फटाक्यांची आतिषबाजी; प्रतिस्पर्ध्यांची घालमेल
कराड शहरात मतदान पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. त्यामुळे संबंधित बाजूकडील उमेदवार विजयी होणार, याबाबत खात्री असल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर रंगली आहे. यांमुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांची घालमेल आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र २१ डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच कोणाचा विजय आणि गुलाल यांवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होणार आहे.
हेदेखील वाचा : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींची मतदान प्रक्रिया पूर्ण; दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला






