अमरावतीतील भाजपच्या सत्कार सोहळ्यावर काँग्रेसचे अतुल लोंढे आक्रमक झाले आहेत (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दशहतवादी हल्ला करण्यात आला. यामुळे काश्मीरमध्ये हिंसाचार आणि दहशतवाद डोके वर काढत असल्याचे दिसून आले. मात्र यावेळी काश्मीर लोकांची दहशतवादाविरोधात एकजुट देखील दिसून आली. या हल्ल्यामध्ये २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे. तसेच भारतातील सर्व राज्यातून याविरोधात आंदोलन आणि निदर्शन करण्यात आली आहे. देशातील अनेक कार्यक्रम, स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. असे असताना भाजप नेत्यांचा सत्कार सोहळा ठेवण्यात आला आहे. यावरुन आता विरोधक आक्रमक झाले आहेत.
“पहलगाम हल्ल्याच्या विरोधात देशभरातून शोक आणि रोष व्यक्त केला जात आहे. अनेक बाजारपेठांमध्ये बंद देखील पाळण्यात आला आहे. संपूर्ण देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?” असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपच्या नेत्यांनी सत्कार कार्यक्रम ठेवल्यामुळे कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, “अमरावती मध्ये 26 तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चितेची राख विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही दुःखाचे वातावरण आहे ते अजून या धक्क्यातून सावरले नाहीत. परंतु भाजपा नेते मात्र हार तुरे घेत आहेत हीच भाजपाची संस्कृती आहे का? राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत, या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही,” अशा शब्दांत अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पहलगाम दहशतवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जेष्ठ नेते व खासदार शरद पवार यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा काश्मीरचे लोकं रस्त्यावर उभे राहिले. भारताच्या बाजूने उभे राहिले. ही जमेची बाजू आहे. जे लोक भारताच्या बाजूने उभे राहिले त्यांचा चरितार्थ हा कदाचित संकटात जाईल अशी स्थिती आहे. याचीच मला काळजी याची आहे. काश्मीरचं अर्थकारण संकटात येईल. लोक पर्यटनाला जाणार नाहीत. याचा परिणाम काश्मीरच्या लोकांवर होईल. याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे,” अशी विनंती शरद पवार यांनी केली आहे.