PSL-11 मधून अफगाण खेळाडूंनी घेतली माघार(फोटो-सोशल मीडिया)
Pakistan Super League-11 : पाकिस्तानला झटक्यांवर झटके बसत असल्याचे वारंवारं दिसून येत आहे. आता अशातच पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या आवृत्तीपूर्वी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अनेक अफगाण क्रिकेटपटूंनी माघार घेतली आहे. पीएसएल मध्ये अशा प्रकारची औपचारिक लिलाव प्रक्रिया पहिल्यांदाच आयोजित केली गेली होती. सुरुवातीला असे वृत्त समोर आले होते की मुजीब उर रहमान, सेद्दिकुल्लाह अटल, मोहम्मद नबी, वकार सलामखेल आणि फजल हक फारुकी यांच्यासह अनेक प्रमुख अफगाण खेळाडूंकडून लाहोरमध्ये लिलावासाठी नोंदणी करण्यात आली होती.
हेही वाचा : SL vs OMA : 6,6,6,6,6… दासुन शनाकाने फलंदाजीने केला कहर, तुफानी अर्धशतक झळकावून रचला इतिहास
तथापि, पेशावर झल्मीने थेट अफगाण विकेटकीपर-फलंदाज रहमानउल्लाह गुरबाजला करारबद्ध करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले. या निर्णयावर देखील टीका झाली, ज्यामुळे गुरबाजने पीएसएलमधून माघार घेतली. त्यानंतर लवकरच, इतर अफगाण खेळाडूंनी देखील आता लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली आहे.
पीएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलमान नसीर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, काही अफगाण खेळाडूंचा लिलाव यादीत समावेश करण्यात आला होता, परंतु कोणत्याही फ्रँचायझीकडून त्याची निवड करण्यात आली नाही. ते म्हणाले, “लिलावात काही अफगाण खेळाडू होते, परंतु कोणत्याही संघाने त्यांना खरेदी केले नाही.” तथापि, त्यांनी हे देखील मान्य केले की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अलिकडच्या ताणलेल्या संबंधांचा संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.
हेही वाचा : NEP vs ITA, T20 World Cup 2026 : नेपाळने इटलीसमोर टेकले गुडघे! पौडेल आर्मी 123 धावांवर गारद
नसीर यांच्या मते, गुरबाजच्या समावेशानंतर झालेल्या टीकेचा वातावरणावर खूप परिणाम झाला. त्यांनी असे देखील सांगितले की टीका टाळण्यासाठी गुरबाजने माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि इतर खेळाडूंकडून देखील त्याचेच अनुकरण करण्यात आले.
एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की, गेल्या वर्षी दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाखाली पाकिस्तानी सैन्याकडून अफगाणिस्तानच्या काही भागात हवाई हल्ले करण्यात आले होते. यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि राजकीय संबंधांमध्ये तणावात वाढ झाली होती. त्यावेळी अनेक अफगाणिस्तानी खेळाडूंनी देखील सोशल मीडियावर पाकिस्तान सरकारवर टीका केली होती. आता पीएसएल ११ च्या लिलावात अफगाणिस्तानी खेळाडूंनी घेतलेल्या माघारीवरुन पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारणातील परस्परसंवाद अधोरेखित झाल्याचे दिसून येत आहे.






