सैफ अली खानच्या हल्ल्यावरुन काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या आहेत (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : बॉलीवुडचा अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्तीने घरात शिरुन चोरीचा प्रयत्न केला. त्याला अडवायला गेलेल्या सैफवर चोराने धारदार शस्त्राने हल्ला केला. यामुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. महायुती सरकारमधील गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. यानंतर आता कॉंग्रेस नेत्या व खासदार वर्षा गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील कायदा व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच ‘मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. तसेच महाराष्ट्रात जे घडतंय ते धक्कादायक आहे’, असं म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
माध्यमांशी संवाद साधताना कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याचं वृत्त सकाळी समोर आलं. खरं तर मुंबईमध्ये अशा प्रकारची घटना घडणं हे दुर्देवी आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं हे उदाहरण आहे. कारण अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला झाला. त्याआधी वांद्रे परिसरात तीन मोठे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर त्यांच्यावर हल्ला झाला, दुर्दैवाने त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला झाला. सलमान खानच्या घरावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सैफ अली खानच्या घरात घूसून हल्ला झाला”, अशा शब्दांत वर्षा गायकवाड यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की “सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी जास्त लोकांचा वावर आहे, त्या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडायला लागल्या आहेत. कारण सध्या पोलिसांचं मानसिक खच्चीकरण केलं जात आहे. पोलिसांच्या आम्ही तुमच्या बदल्या करू, अशा प्रकारची विधाने केली जातात. आज गृहविभागावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना यावर उत्तर द्यावं लागेल. कारण महाराष्ट्रातील परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटना, तसेच पुण्यातील कोयता हल्ल्याच्या घटना किंवा आता मुंबईत तीन चार घटना ज्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या घडल्या आहेत. यावर आता गृहमंत्री फडणवीसांना उत्तर द्यावं लागेल. कारण ज्या व्यक्तींना पोलीस संरक्षण आहे, तसेच स्वत:ची सुरक्षेची व्यवस्था आहे. पण तरीही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे सर्वसामान्य माणसांवर काय परिणाम होतील? सुरक्षा असलेली लोक सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसांचं काय?”, असे अनेक सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले आहेत.