काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतामध्ये हिटरशाही सुरु झाल्याची टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
सोलापूर : राज्यासह देशभरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा मोठा उत्साह आहे. राजकीय वर्तुळातून देखील भारतरत्न आंबेडकर यांना अभिवादन केले जात असून त्यांच्या कार्याचे स्मरण केले जात आहे. दरम्यान, यावरुन नेत्यांमध्ये वादंग निर्माण झाला आहे. कॉंग्रेस नेत्या व खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशाची वाटचाल ही हिटलरशाहीकडे सुरु असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, “बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि लोकशाही निर्माण केली आहे. संविधान आपण वाचवलं पाहिजे. जेव्हा सत्ताधाऱ्यांचे विचार हे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत, जेव्हा देशाचे गृहमंत्री म्हणतात की संविधान संविधान संविधान हे अभी फॅशन बन गया है, असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “जर संविधान आणि बाबासाहेबांचा असा तिरस्कार केला जात असेल, तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की, लोकशाहीची चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. भाजपने जेव्हा 400 पारचा नारा दिला होता, तेव्हा कोणाला माहिती होतं की, संविधान बदलण्यासाठी त्यांनी हा नारा दिला होता, पण त्यांचे पितळ उघडे पडले पडले. बाबासाहेबांना मानणारे जोपर्यंत आहेत, तो पर्यंत संविधानाला आम्ही हात काय बोट पण लावू देणार नाही. बाबासाहेब हे केवळ आपल्या देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी होते ही बाब विसरता येणार नाही, अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतामध्ये हिटलरशाही आहे असे म्हणत टोला लगावला. त्या म्हणाल्या की, जिथे हिटलरशाही आहे. अमेरिका, रशिया किंवा आपला देश. सगळीकडे हिटलरशाही चालू आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. संविधानाने दिलेले अधिकार हिसाकावून घेतले जात आहेत, आचार्य अत्रेचा काळ होता, जिथे प्रत्येक राज्यकर्त्यांचा बाबतीत ते विनोद करायचे, त्यावेळेस त्यांच्यावरती या थराला जाऊन कधी कोणी काहीही केलं नाही. पण आता हे व्यासपीठ राहिलेले नाही, जे व्यासपीठ बाबासाहेबांनी दिलं ते राहिलंच नाही. जेव्हा तीन-तीन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणूक होत नाहीत त्यातूनच संविधानाचा अपमान होतो, अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
केंद्र सरकार असो की, राज्य सरकार ते संविधानाला मानत नाही. संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. आपला देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जातो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वचन दिले होते. मात्र आता ते म्हणत आहे की सगळी वचने पूर्ण होत नाही. ही फसवणूक आहे. या सरकारला आता आवाज उरलेला नाही, अशी गंभीर टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.