आयएमडीचा मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आणि देशातील अनेक राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाचा तडाखा अनेक भागात बसला आहे. कडक उन्हापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मात्र पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशातील काही भागात पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासाह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाबरोबरच वादळी वारे आणि गारपीट असे दुहेरी संकट येण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये गर वादळी वाऱ्यासाह गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रतितास 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ओडिशा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘या’ भागात पारा 45 अंशाच्या पुढे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अनेक भागात कडक उन्हाळा जाणवत आहे. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उद्रेक मांडला आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव, भुसावळ भागात उष्णतेची लाट दिसून येत आहे. भुसावळ तालुक्यात तापमान 45 अंशावर जाऊन पोचले आहे.
45 अंश तापमान हे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट असण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमान वाढलेले असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले आहे. सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईकरांसाठी पुढील दोन दिवस अत्यंत महत्वाचे
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत पुढील एक ते दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्हे, पालघर, ठाणे अशा जिल्ह्यांना देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा या भागात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. तर राज्यातील इतर भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले असल्याचे म्हटले जात आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही तापमान ४० अंशाच्या वर दिसून येत आहे.