कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने होऊन गेले असले तरी त्यावरुन अद्याप राजकारण रंगलेले आहे. यंदाची लढाई ही महायुती व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र भाजप आणि महायुतीला लढाईमध्ये प्रचंड बहुमत मिळाले. मात्र यावर कॉंग्रेसकडून संशय व्यक्त केला जात आहे. निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर आणि मतदारांच्या अचानक वाढलेल्या टक्केवारीवरुन कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लेख लिहून टीका केली. यावर भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लेख लिहिला. यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये आर्टिकल वॉर सुरु असताना महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. बोगस मतदार याद्या बनवल्याने, मतांची चोरी करून भाजपा सत्तेत आली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह हा घोटाळा कसा केला गेला याची मांडणी केली आहे. पण निवडणूक आयोग समाधानकारक उत्तरे देत नाही. सर्व प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे ही आयोगानेच दिली पाहिजेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाची वकिली करू नये, असे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखाला उत्तर देत नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीने देशात चुकीचा पायंडा पाडला आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेवरच संशय व्यक्त होत असेल तर लोकशाही व्यवस्थेसाठी ते अत्यंत गंभीर व धोकादायक आहे. 2014 पासून देशातील सर्व स्वायत्त संस्था भाजपा सरकारने कठपुतली बाहुल्या बनवल्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी या संस्थांचा स्वायत्तपणा टिकला पाहिजे यासाठीच राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत सरकार व संस्थांना प्रश्न विचारणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नावर आयोगाने उत्तरे दिली पाहिजेत, भाजपा व फडणवीस यांच्या उत्तरांना काँग्रेस भीक घालत नाही. फडणवीस काय आयोगाचे वकील आहेत का, त्यांनी ही वकिली बंद करावी,”असे खडेबोल नाना पटोले यांनी सुनावले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, आरोप केले नाहीत, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे गरजेचे आहेत असे असताना भाजपा व देवेंद्र फडणवीस मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे वळवत राहुल गांधी व भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस पक्षाची भूमिका भारत जोडोची आहे पण भाजपा व फडणवीस यांची विचारसरणी बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशी विभाजनकारी भारत तोडोची आहे,” असेही नाना पटोले म्हणाले..