राहुल गांधींच्या लेखावर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर गोपाळ तिवारी यांनी निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदानामध्ये घोळ झाला असल्याचा आरोप केला. या संदर्भात त्यांनी लेख देखील लिहिला. राहुल गांधीच्या या लेखाला भाजप नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सुरु असलेल्या या ऑर्टिकल वॉरवरुन राजकारण तापले आहे. दरम्यान या प्रकरणावर आता कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस’चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देशास सक्षम ‘विरोधी पक्ष नेता’ देण्यासाठी, जनतेने काँग्रेस ला ५२ वरून १०२ जागा दिल्या. विरोधी पक्ष नेत्याच्या ‘देशातील वास्तव जनाधाराची’ बूज राखून फडणवीसांनी भाष्य करावे असा इशारा देखील गोपाळ तिवारी यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडून आयोगा समोर (सर्व संदर्भासह) वृत्तपत्रे माध्यमातून उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर भाजपचा कोणताही संविधानिक अधिकार पोहोचत नसतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या नेत्यांनी विसंगत राजकीय विधाने व आरोप करण्याची माकडचेष्टा का करताहेत असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले की, “वास्तविक निवडणूक आयोगाच्या कार्य व कर्तव्यपुर्तीवर प्रश्न विचारले असतांना, अचानक वावटळ उठल्या प्रमाणेच निवडणूक आयोगास पाठीशी घालण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्नच मुळात संशयावर शिक्कामोर्तब करणारे असून भाजप नेत्यांचे हे प्रकार असंविधानिक व निंदनीय प्रयत्न आहेत.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
2019च्या तुलनेत, 2024च्या निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनतेने १००% शिक्कामोर्तब करून काँग्रेसला 52 वरून 102 जागा बहाल केल्या व देशास सक्षम ‘विरोधी पक्ष नेता’ देण्यासाठी जनतेने काँग्रेस’ला अधिक मजबूत केले.
याच जबाबदारीच्या जाणीवेतून, लोकशाहीच्या जपणुकीसाठी महा विकास आघाडीच्या वतीने, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकसंदर्भात गंभीर मुद्दे सर्व प्रथम संसदेत उपस्थित केले. त्या नंतर मविआ नेत्यांचे सोबत पत्रकार परिषदेत ही ते उपस्थित केले. जेष्ठ नेत्यांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारी केल्या, राज्यातील प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले.
राज्यातील जाहीर नोंदणीकृत मतदार (सज्ञान लोकसंख्या) संख्येपेक्षा झालेले मतदान जास्त कसे (?) व इतर अनेक गंभीर मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले तसेच अनेक काँग्रेस व मविआ उमेदवारांनी न्यायालयात देखील दाद मागितली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कुठेही सत्य व वास्तवतेला दाद दिली जात नाही हे पाहून राहुल गांधींनी वृत्त माध्यमातून हा प्रकार जनतेसमोर आणण्याचा संविधानिक कर्तव्यपूर्तीचा भाग आहे. तसेच सदरच्या लेखात राहुल गांधींनी कुठेही सत्तापक्षाला विचारणा केली नसताना मात्र विनाकारण निवडणूक आयोगा ऐवजी लक्ष भरकटण्याचे निंदनीय प्रकार भाजप नेते करत असल्याचे मत काँग्रेस’चे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले.