Photo Credit- Social Media महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध
पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. महायुतीने प्रचार करताना लाडकी बहीण योजनेचा पुरेपर प्रचार सुरु केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे लाडकी बहीण योजनाची जोरदार जाहिरातबाजी करत आहेत. मात्र योजनेमुळे महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. लाडकी बहीण नक्की अजित पवारांची, एकनाथ शिंदेंची की देवेंद्र फडणवीसांची असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या नेत्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
मंत्री शंभूराज देसाई यांनी पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या उल्लेखावरुन निशाणा साधला. महायुतीमधील नेते अजित पवार हे योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री शब्द वापरत नसल्यामुळे त्यांना हा अप्रत्यक्ष टोला लगावला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, कालपासून इतर लोकही हे नाव घ्यायला लागले आहेत. नवीन योजना होती. त्यामुळे बऱ्याचदा अनावधानाने फक्त लाडकी बहीण योजना असं नाव घेतलं जायचं. पण आता महायुतीतले सगळे पक्ष या योजनेचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असा करत आहेत. महिलांना जर विचारलं की ही योजना कुणी आणली? तर त्या स्पष्ट सांगत आहेत की एकनाथ शिंदेंनी आणली. त्यामुळे महिलांमध्ये हे नक्की आहे की ही योजना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं आणली आहे, असे मत शुंभराज देसाई यांनी व्यक्त केले.
या प्रकरणाची चौकशी
पुढे ते म्हणाले की, अशा प्रकरणांची चौकशी चालू आहे. महिला लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी नेमलं होतं. पण जेव्हा अशा बाबी लक्षात आल्या, तेव्हा फक्त अंगणवाडी सेविकांच्या मार्फतच फॉर्म भरून घेतले जातील, असं नियोजन केलं आहे. ज्यांनी कुणी एवढ्या चांगल्या योजनेत चुकीची नावं, फॉर्म भरून, फोटो लावून गैरप्रकार केलेत, त्याची चौकशी करण्याचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती देखील शंभूराज देसाई यांनी दिली आहे.