राज्यात ओला दुष्कार जाहीर होणार का, याबाबत दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले
Wet Drought Farmers: राज्यातील अनेक भागात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने त्या दृष्टीने हालचालीदेखील वाढवल्या आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यावेळी सर्व मंत्री ओला दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडू शकतात. त्यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहे.
सततच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
शेतात उभ्या पिकांसोबतच साठवलेला धान्यसाठा व खतसाठाही भिजल्याने शेतकऱ्यांवर डबल मार बसली आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. जनावरांसाठीचा चारा व गोठ्यांमध्ये साठवलेले गहू-भाकरीसुद्धा खराब झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना निसर्गाच्या या संकटाचा सामना मोठ्या धीराने करावा लागणार आहे. राज्य सरकार आपल्या पाठिशी आहे. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत त्यांना भरपाई देण्यात आली आहे. काहींना दिवाळीपर्यंत मदत दिली जाईल.
दरम्यान यावेळी ओला दुष्काळ जाहीर करणार का असे विचारले असता भरणे म्हणाले, कोणतीही मागणी करताना निकष बघणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. राज्य किंवा केंज्र सरकारची मदत ठरली आहे. तसेच काही काळ ही रक्कम वाढवण्यात आली होती. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर याबाबतचा अहवाल ठेवला जाणार असून शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेतला जाईल, ज्या शेतकऱ्यांची जनावरे वाहूल गेली आहेत, त्यांनाही मदत केली जाईल. राज्यात 70 हजार एकरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात बीड, नांदेड, यवतमाळ जालना, परभणी इ. जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. एकूण 30 जिल्ह्यांमध्ये शेतपिकांच्या नुकसान झाले आहे. असंही भरणे यांनी नमुद केलं.