धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी उलथापालथ होत आहे. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसोबत धनंजय मुंडे यांचे संबंध होते. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये असलेल्या या संबंधामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होते. सत्ताधारी नेत्यांसह विरोधी नेत्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर त्यांनी राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, “राजीनामा जेव्हा ते देतील त्यानंतर आम्ही बोलायला हवं सगळ्यांनी, आता साधारण महाराष्ट्राचा हा कल आहे. किंवा महाराष्ट्राचा संताप आहे, आणि हा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. इतक्या गोष्टी समोर येऊन सुद्धा आज तुम्ही चित्र पाहिले असतील संतोष देशमुख यांना तिथे क्रूरपणे मारण्यात आलं. मृत्यूनंतर त्यांच्या तोंडामध्ये जो प्रकार केला लघवी करण्याचा, किती पराकोटीचा क्रौर्य या महाराष्ट्रात बीडमध्ये आहे, जिथे धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सर्व चित्र महाराष्ट्रात किती क्रूर
पुढे ते म्हणाले की, “हे सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे हे काही महात्मा नाहीत हे मिस्टर फडणवीस यांना देखील माहिती आहे. अजय पवार यांना देखील माहिती आहे. त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशाप्रकारे मतदारांना धमक्या आणि दहशत या माध्यमातून मतदान करू दिले नाही. हे निवडणूक आयोग आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलं आहे आणि अमित शहा यांनी देखील पाहिलं, त्यांची निवडणूक त्याच वेळा रद्द व्हायला पाहिजे होती. तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुख यांचे प्राण वाचले असते. आज पोलिसांनी जे पुरावे जे व्हिडिओ जे फोटो समोर आणले ते सर्व चित्र महाराष्ट्रात किती क्रूर झालेले आहे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
तुमची मान शरमेने खाली गेली
“एका बाजूला तुम्ही छावा चित्रपटात औरंगजेब किती क्रूर आहे ते दाखवता. औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रूर आणि आणि त्यांचा मृत्यू दाखवला. तितकाच क्रूरपणा संतोष देशमुखांच्या बाबतीत झाला आहे. संभाजी राजांच्या राज्यामध्ये प्रजेतील एक नागरिक संतोष देशमुखचा मृत्यू झाला आणि त्याचा मृत्यूचा हत्येचा खेळ राजकारणांनी केला. फडणवीस म्हणतात कोर्ट ठरवेल. कोर्ट नंतर ठरवेल आता प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत, नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा त्यांनी घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाला छाती ठोकपणे सांगत आले असते . आज लोकांचा दबाव आहे प्रेशर आहे. तुमची मान शरमेने खाली गेली आहे. काल व्हिडिओ आणि फोटो पाहून त्यानंतर तुम्हाला उपरती झाली असेल तर आधी राजीनामा घेऊ द्या मग आम्ही बोलतो,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत, हे आता लक्षात आलं. या राज्याचे मुख्यमंत्री कायदा आणि न्याय याची बुज राखत नाही आपल्या लोकांच्या बाबतीत काही लोक आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न करतात त्याला न्याय म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्यांनी मंत्र्यांना ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला हवा जे भ्रष्टाचारी आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. यापुढे वाचवले जाईल वाल्मिक कराडला हे वाचवले जाईल, वाल्मिक कराडला धनंजय मुंडे वाचतील आणि धनंजय मुंडेंला त्यांचे आका वाचवतील,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केली आहे.