फोटो - सोशल मीडिया
उंब्रज : विधानसभेची निवडणूक अभूतपूर्व गोंधळात पार पडत असली तरी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चेहरा महत्वाचा ठरणार आहे. स्वच्छ, निष्कलंक आणि जनमानसात मिसळणारे व्यक्तिमत्त्व मतदारांना आकर्षित करत असून, सभोवताली असणारे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी यांनी केलेली मदत तसेच अडीअडचणीत कोण धावून येणार याकडे मतदार लक्ष देऊ लागले आहेत.
हेदेखील वाचा : हे एक कव्हर फायरिंग…; विनोद तावडे यांच्यावरील आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
कराड उत्तरची लढत अतिशय निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. जोर कुणाचा याबाबत वेगवेगळे मतप्रवाह येत असले तरी युवा मतदारांवर छाप सोडणारी उमेदवारी कुणाला तारणार? याबाबत राजकीय जाणकारांच्यात चर्चा झडू लागल्या आहेत. मतदारसंघातील सुमारे सतरा हजार मतदार आणि तरुणाई ऐनवेळी कुणाचा घात करणार ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.
दबावाला बळी न पडता त्यांनी भविष्यातील राजकीय वाट चोखाळताना कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही ही भीमगर्जना मूळच्या कराड उत्तरेत एक नेतृत्व उमलायला लागल्याची चर्चा असून, एकास एक लढतीत दहा हजारापेक्षा जास्त मतदान घेतल्यास निर्णायक ठरण्याची चिन्हे अटीतटीच्या लढतीत दिसू लागली आहेत. यामुळे कराड उत्तरेत अंतिम सत्य काय ? याबाबत खसखस पिकली आहे.
वाढत जाणारी समर्थकांची गर्दी, पक्षातील गट,सोशल मीडिया आणि मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी या जमेच्या बाजू असल्यातरी विद्यमान आमदारांची गेल्या पंचवीस वर्षात जतन केलेली व्होट बँक दबक्या पावलाने कार्यरत आहे. तसेच कोणताही पत्ता अजून उघड केला नसल्याने परिस्थिती जरी २००४ सारखी निर्माण झाली तरी ऐनवेळी केल्या जाणाऱ्या राजकीय खेळ्या अजून बाकी असल्याने हवा कोणाची यापेक्षा कोणता गट शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.
खटाव, कोरेगाव, सातारा आणि कराड या चार तालुक्यातील मतदार समाविष्ट असल्याने लगतच्या तालुक्यातील जनसंपर्क महत्वाचा ठरणार असून उमेदवाराला एकाच वेळी सर्वत्र डोळ्यात तेल घालून कार्यरत राहावे लागणार आहे. सोबतीला असणारे निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी याबाबतीत बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. सूक्ष्म बाबींचा विचार करीत असताना एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी तळागाळातील जनतेत संपर्काचे महत्त्वाचे स्तोत्र ठरणार आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Assembly Election Voting Live 2024 : पुण्यातील कोथरूड मतदार संघातील EVM मशीन बंद