नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणुका जाहीर होताच अनेक पदाधिकारी-नेतेमंडळींकडून पक्षप्रवेश केला जात आहे. त्यातच आता माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे आणि त्यांच्या पत्नी तेजश्री वाजे यांनी शुक्रवारी (दि.१४) नाशिक येथे भाजप कार्यालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सिन्नर नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक असताना हेमंत वाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे त्यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते हेमंत वाजे यांनी कमळ हाती घेतल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सिन्नरमध्ये मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, हेमंत वाजे हे नाशिक जिल्ह्याच्या पहिल्या महिला आमदार रुख्मिणीबाई वाजे यांचे पुत्र आहेत. त्यांचे वडील दिवंगत विठ्ठल वाजे यांनी सिन्नरचे नगराध्यक्षपद भूषवले. वाजे हे शिवसेनेचे गटनेते होते. वाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, यासाठी मविप्रच्या माजी सरचिटणीस निलीमा पवार, अमृता पवार, कोपरगावच्या संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे व कोल्हापूर येथील सासुरवाडीच्या नातेवाईकांकडून आग्रह होता.
निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना
विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वाजे यांची भेट होऊन मुंबईला प्रवेश करुन वेळ घालण्यापेक्षा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पत्नी तेजश्री वाजे यांचा प्रवेशसोहळा पार पडला. यावेळी गिरीश महाजन यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नेत्यांनी मांडली स्वतंत्र राजकीय चूल
दुसरीकडे, राज्यात महायुतीची सत्ता, पंढरपूरात काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिल्याने महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आजतरी स्वतंत्र राजकीय चूल मांडली आहे. यामुळे येथील नगरपालिकेची आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल, असे दिसते आहे. आरक्षण सोडत जाहीर होण्याच्या आधीच पालिकेच्या निवडणुकीची उत्सुकता लागलेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या परीने जनसंपर्क वाढविला आणि पालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर होताच पक्षप्रमुख अधिक सक्रिय झाले.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis यांच्या हस्ते कुंभमेळ्यासाठी 5,500 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन; म्हणाले…






