'कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये...'मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी (Pune Moshi Building Collapse) येथे झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटले असून, बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. यावरून आता मोठ्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून शासन आणि प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अश्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोशी दुर्घटनेला 64 तास उलटले असून अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध पूर्ण झालेला नाही. मुख्यमंत्री स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्येक मिनिटाचा आढावा घेतील, सर्व यंत्रणांना जबाबदार धरतील आणि बचावकार्यातील प्रत्येक अडथळा दूर करतील, अशी जनतेची अपेक्षा होती, असे सपकाळ यांनी य्म्हंटले आहे.
आपल्या ‘X ‘ पोस्टमधून सपकाळ यावेळी म्हणाले, “कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्र्याची बैठक पंचतारांकित हॉटेल मध्ये… मोशी दुर्घटनेला 64 तास उलटले… तरीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध पूर्ण झालेला नाही. संकटाच्या अशा प्रसंगी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करताना दिसायला हवे होते. मुख्यमंत्री स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्येक मिनिटाचा आढावा घेतील, सर्व यंत्रणांना जबाबदार धरतील आणि बचावकार्यातील प्रत्येक अडथळा दूर करतील, अशी जनतेची अपेक्षा होती. पण त्याऐवजी हॉटेलमधील बैठकीतून आढावा घेतल्याचे चित्र समोर आले.”
कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्र्याची बैठक पंचतारांकित हॉटेल मध्ये… मोशी दुर्घटनेला 64 तास उलटले… तरीही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध पूर्ण झालेला नाही. संकटाच्या अशा प्रसंगी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करताना दिसायला हवे होते. मुख्यमंत्री स्वतः घटनास्थळी… pic.twitter.com/7tx38Gx9ww — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 11, 2026
ते पुढे म्हणाले, “64 तास उलटूनही शोधकार्य का रखडले? आवश्यक यंत्रणा वेळेत उपलब्ध करण्यात सरकार अपयशी ठरले का? या विलंबामुळे जर एखादा जीव धोक्यात आला असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार? संवेदनशील प्रसंगी नेतृत्व एसी हॉलमधील बैठकीत नव्हे, तर दुर्घटनास्थळी दिसते. महाराष्ट्राला आता प्रसिद्धीचे फोटो नकोत; उत्तरदायित्व, निर्णयक्षमता आणि परिणाम हवेत.”
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी (Pune Moshi Building Collapse) येथे झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेला तब्बल 64 तास उलटले असून, बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा सलग प्रयत्न करत आहे. अत्याधुनिक कटर मशिनरीच्या मदतीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हटवण्यात आला असून, आता पहिल्या मजल्याचा स्लॅब पाडण्याचे काम सुरू आहे.
दुर्घटनेनंतर एकूण 23 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. मात्र, अजूनही आठ कामगार स्लॅबखाली अडकल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अधिक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, इमारतीचा उर्वरित ढाचा अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तो कधीही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बचाव पथकाला प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक काम करावे लागत आहे. मोठ्या काँक्रीट स्लॅबमुळे जेसीबी किंवा जड यंत्रांचा वापर मर्यादित ठेवण्यात आला असून, अत्याधुनिक कटरच्या साहाय्याने स्लॅबचे तुकडे करून हटवले जात आहेत.






