'नांदेडमध्ये पुलाची भिंत कोसळली, आता बोलणारेही भाडे के तट्टू?' मुख्यमंत्री फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
मिसिंग लिंकवरील दरड कोसळण्याच्या घटनेवरून राज्यभरात संतापाचे वातावरण असताना आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये याची पुनरावृत्ती झाली आहे. नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली असून यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
मिसिंग लिंक दुर्घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण गरम असून विरोधकांनी यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात यावरून विरोधकांवर टीका करत विरोधक राजकारण करत असल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणाबाबत बोलणार्यांना ‘भाडे के तट्टू’ म्हणत टीका केली होती यावरून आता हर्षवर्धन सपकाळांनी टीका करत “याविरोधात बोलणारे पण भाडे के तट्टू ठरणार का मुख्यमंत्री महोदय..?” असा सवाल उपस्थित केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली. ते म्हणाले, “आता याविरोधात बोलणारे पण भाडे के तट्टू ठरणार का मुख्यमंत्री महोदय..? नांदेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, पण हा अपघात सरकारच्या निष्काळजी कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे करतो.”
आता याविरोधात बोलणारे पण भाडे के तट्टू ठरणार का मुख्यमंत्री महोदय..? नांदेड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, पण हा अपघात सरकारच्या निष्काळजी कारभारावर मोठे… pic.twitter.com/6IezDMsqGV — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) July 9, 2026
“नागपूर–सोलापूर महामार्गावरील नांदेडमधील रस्ते आणि पुलांची कामे गेली अनेक वर्षे रखडली आहेत. लाखो विद्यार्थी, रुग्ण, पालक आणि नागरिक धुळीचे रस्ते, वाहतूक कोंडी आणि निकृष्ट कामांचा त्रास रोज सहन करत आहेत. ज्या मार्गावर SGGS अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण पॉलिटेकनिक, सहयोग महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे, त्याच मार्गावरील ही दुर्घटना अधिक गंभीर आहे. ही फक्त पुलाची भिंत कोसळलेली नाही… सरकारच्या तथाकथित विकासाच्या दाव्यांची भिंत कोसळली आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर घणाघात केला.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुसळधार पावसानंतर मिसिंग लिंक प्रकल्पावरून खोटी माहिती पसरवली जात आहे. इतके खोटारडे लोक पैदा झाले आहेत, एक हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील,” असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, “महायुती सरकारने धाडस दाखवून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला. मागील सरकारने हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगत अनेक कारणे दिली होती,” असा दावाही त्यांनी केला.
राज ठाकरेंच्या टीकेला राम कदमांचा पलटवार; मिसिंग लिंक वादावर भाजप-मनसे आमनेसामने
सोशल मीडियावरील टीकेचा उल्लेख करत फडणवीस टीकाकारांना ‘भाडे के टट्टु‘ म्हणाले. “देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, चालेल. मी शिव्याप्रूफ आहे.” पुढील दहा वर्षांनी टीका करणारे दिसणार नाहीत, मात्र मिसिंग लिंक प्रकल्प आणि तो उभारणाऱ्या नेतृत्वाची नोंद इतिहासात राहील, असेही त्यांनी म्हटले. ट्रोलर्सवर निशाणा साधत ते म्हणाले, “पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देतात. माझी बदनामी करा, हरकत नाही; पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाही सोडणार नाही,” असा इशारा दिला.






