'हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले'; मिसिंग लिंकवरील टीकेला फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई वाहतुकीवर परिणाम झाला. याचदरम्यान पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पात भूस्खलन झाल्याने हा मार्ग जवळपास 20 तास बंद ठेवावा लागला. या घटनेनंतर विरोधकांनी प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सरकारवर जोरदार टीका केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत विरोधक आणि ट्रोलर्सवर निशाणा साधला.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुसळधार पावसानंतर मिसिंग लिंक प्रकल्पावरून खोटी माहिती पसरवली जात आहे. इतके खोटारडे लोक पैदा झाले आहेत, एक हजार खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील,” असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, “महायुती सरकारने धाडस दाखवून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला. मागील सरकारने हा प्रकल्प शक्य नसल्याचे सांगत अनेक कारणे दिली होती,” असा दावाही त्यांनी केला.
फडणवीस यांनी सांगितले की, “मिसिंग लिंक हा केवळ रस्ता नसून भारतातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. या प्रकल्पामुळे भारतातील सर्वात उंच पूल आणि जगातील मोठ्या बोगद्यांपैकी एक उभारण्यात आला असून घाट विभागातील अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले की, “मुसळधार पावसामुळे दरडीचा मलबा आल्याने कमानीचा काही भाग कोसळला, मात्र पुलाला कोणताही तडा गेला नाही. अवघ्या 18 तासांत वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. तरीही विरोधकांनी सात हजार कोटी रुपये पाण्यात गेले” असा अपप्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला.
सोशल मीडियावरील टीकेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, चालेल. मी शिव्याप्रूफ आहे.” पुढील दहा वर्षांनी टीका करणारे दिसणार नाहीत, मात्र मिसिंग लिंक प्रकल्प आणि तो उभारणाऱ्या नेतृत्वाची नोंद इतिहासात राहील, असेही त्यांनी म्हटले. ट्रोलर्सवर निशाणा साधत ते म्हणाले, “पैसे घेऊन सोशल मीडियावर शिव्या देतात. माझी बदनामी करा, हरकत नाही; पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर कोणालाही सोडणार नाही,” असा इशारा दिला.
अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?






