'डॉ. अमोल कोल्हे यांनी असे विधान केले असेल तर ते दुर्दैवी'; संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं?
मुंबई : ऑपरेशन ‘टायगर’, ऑपरेशन ‘तुतारी’…एक दिवस ऑपरेशन ‘कमळ’ही होईल. काल तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. ३५-३५ कोटींची ऑफर दिल्याचे आरोप आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि खासदार यांच्यावर हल्ले सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाने देशाचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे की, भविष्यात लोकांना सांगावे लागेल की, या देशात कधी लोकशाही होती, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘ऑपरेशन तुतारीबाबत मी काय बोलू? डॉ. अमोल कोल्हे यांनी असे विधान केले असेल तर ते दुर्दैवी आहे. मी त्यांना ओळखतो. ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतात आणि सध्या महात्मा फुले यांची भूमिकाही करत आहेत. छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी व धर्माभिमानी होते. त्यांच्या भूमिका साकारणारी व्यक्ती विचारद्रोह किंवा धर्मद्रोह करणार नाही, अशी माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याची खात्री आहे. त्यांनी महायुतीची भूमिका मांडली असेल, तर महायुतीमध्ये कोण आहेत? महायुतीमध्ये धर्मद्रोही आणि रामद्रोही आहेत.
Amol Kolhe News : सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
दरम्यान, राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्या पक्षात किंवा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंदे गटात कोण जाणार? हे सर्व रामद्रोही आणि हिंदूद्रोही एकत्र आहेत. जे या गटात जाण्याचा विचार करत आहेत किंवा गेले आहेत, त्यांची इतिहासात धर्मद्रोही आणि रामद्रोही म्हणून नोंद होईल. डॉ. कोल्हे कोणत्या अर्थाने बोलले, हे मला माहिती नाही. ते शिवसेनेत असताना निष्ठेने काम करत होते. त्यानंतर ते शरद पवार साहेबांसोबत गेले आणि आता त्यांच्यासोबत काम करत आहेत. त्यांना निवडून आणण्यात त्या भागातील हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे.
आमचा साधा शिवसैनिकही जिंकू शकतो मतदारसंघ
आमचे जिल्हाप्रमुख सांगतील की, तो मतदारसंघ शिवसेनेचा आहे. पडद्यावरील संभाजी महाराज म्हणून आम्ही मनापासून त्यांच्यासाठी काम केले. त्यामुळे त्यांनी काहीही वक्तव्य केले असले, तरी ते मूळ पक्षातच राहतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही. मूळात ती जागा महायुतीची नाही, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची जागा आहे. ती जागा जिंकण्याची क्षमता फक्त आमच्यात आहे. आमचा साधा शिवसैनिकही तो मतदारसंघ जिंकू शकतो.
राज ठाकरेंच्या विधानावरही भाष्य
संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या विधानावरही भाष्य केले. ते म्हणाले, त्यांनी योग्य शब्दांत भाष्य केले. महाराष्ट्राच्या राजकारणात जो बाजार मांडला आहे, त्याबाबत त्यांनी भाष्य केले. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रतिष्ठा होती, विचारांचा प्रवाह होता. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, एन. डी. पाटील, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मधु दंडवते, मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस अशी विविध विचारांची माणसे राज्य आणि देशाच्या हितासाठी एकत्र यायची. आज तसे चित्र राहिलेले नाही.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
भविष्यात केंद्रीय पातळीवरील नेतृत्वासाठी ज्या नेत्यांची नावे घेतली जातात, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. मराठी माणसाचे नाव राष्ट्रीय स्तरावर घेतले जात असेल, तर ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. सत्ताधारी पक्षाकडून ऑफर आली आहे का? असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला असता, मला अजून ऑफर आलेली नाही, पण आल्यास विचार करू, असं सूचक विधान अमोल कोल्हे यांनी केलं.






