मुख्यमंत्र्यांसामोर पक्षांतर्गत नाराजी रोखण्याचे आव्हान (फोटो- सोशल मिडिया)
खेडात एकतर्फी जागावाटप अमान्य
दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाची शिवसेनेने चेष्टा केल्याचा संदेश
खेड: कोकणात मोठा गाजावाजा करत शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवारांनी काल खेडमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र याला २४ तास उलटतात न उलटतात, तोच या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने खेड नगरपालिका निवडणुकीत भाजपला अवघ्या तीन जागा देत बोळवण केल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दापोली येथील कार्यालयात बैठक घेत आपल्या पदाचे राजीनामे दिले असून ही एकतर्फी केलेली युती मान्य नसल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना कळविले आहे. दरम्यान निवडणुकीआधी पक्षांतर्गत नाराजी रोखण्याचे आव्हान मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवार माधवी बुटालांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाला नगरसेवक पदाच्या ३ जागा सोडल्या असल्याचे सांगितले गेले. मात्र ही घोषणा करताना भाजपाला विश्वासात घेतले का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. जर आमच्या एकाही नेत्याला याबाबत काहीच माहिती नसेल तर नक्की ही युती कोणी केली ? असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी? भाजपचा ‘एकला चलो रे’चा नारा तर…
आम्ही कदापि अपमान सहन करणार नाही
या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. खेड नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने दिलेल्या तीन जागा हा सन्मान नसून अपमानच आहे. त्याचप्रमाणे भाजपचे नेते वैभव खेडेकर आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जी अपमानास्पद भाषा वापरली आहे तिचा आम्ही निषेध करत असून आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशाराही यावेळी केदार साठे यांनी दिला.
स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाची शिवसेनेने चेष्टा केल्याचा संदेश
शुक्रवारी सकाळपर्यंत या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने संतप्त झालेल्या खेड, दापोली, मंडणगड येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दापोली कार्यालयात बैठक घेत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. भाजपामध्ये माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रवेश केल्यावर भाजपाची खेडमधील ताकद वाढली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने सन्मानपूर्वक जागा वाटप करावे, अशी भाजपाच्या पदाधिकारी यांची इच्छा होती, मात्र शिवसेनेने केवळ ३ जागा भाजपाला देऊ केल्या आहेत. नगराध्यक्ष पदाची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाची एक प्रकारे चेष्टाच शिवसेनेने केली असल्याचा संदेश या निमित्ताने सर्वसामान्य मतदग्रांमध्ये गेला आहे.
निवडणुकीत किमान ८ ते ९ जागांची केली होती मागणी
भाजपने या निवडणुकीत उपनगराध्यक्ष व किमान ८ ते ९ जागांची मागणी केली होती. मात्र त्यांचा हाती केवळ ३ जागाच आल्या. याबाबतची वस्तुस्थिती तातडीने वरिष्ठांच्या कानावर जावी म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना कळविल्या आहेत. या बैठकीला माजी आमदार सुर्यकांत दळवी, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, सरचिटणीस भाऊ महिला अध्यक्षा स्मिता जावकर, दापोली तालुकाध्यक्ष जयऊ इदानी आदीसह खेड, दापोली, मंडणगड येथील बहुसंख्य प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.






