"मतदानात घोटाळे करायचे त्यांनी केले, शाई पुसली गेली", संजय राऊतांचा सत्ताधारांवर गंभीर आरोप
Sanjay Raut on Municipal Election Result 2026 News Marathi : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात सुरु आहे. यासाठी २.२९९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. याचदरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आलं आहे.
शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी महानगरपालिका निवडणुकीवर म्हटले आहे की, “मुंबईसारख्या शहरातील मतदानाचा पॅटर्न हा एक गंभीर विषय आहे. शिवसेना (यूबीटी), मनसे किंवा काँग्रेस सत्तेत असलेल्या भागातून विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या हजारो मतदारांची नावे गायब आहेत. ईव्हीएम मशीन व्यवस्थित काम करत नाहीत. निवडणूक आयोग आमचे ऐकण्यास तयार नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांमध्ये बैठक झाली. का? आचारसंहिता अजूनही लागू आहे…, तसेच “मतदानाची टक्केवारी कळण्यापूर्वीच एक्झिट पोल बाहेर आले. भाजपने आपला विजय साजरा करायला सुरुवात केली. आम्ही लोकांना घाबरू नका असे आश्वासन दिले आहे…”
“एक्झिट पोल येऊद्या, अजूनव काही पोल येऊद्या, लोकांनी मतदान केले आहे. मतदानात ज्यांना घोटाळे करायचे होते, त्यांनी ते केले आहे.पैसे वाटले गेले आहेत. शाई पुसली गेली आहे. तरीही आम्ही खात्रीने सांगतो की निकाल लागू द्या. तमाम मराठी माणसाने, मुंबईकरांनी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या युतीला मतदान केलं आहे”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याबाबत कोणतीही कृती झाली नाही. तरीही, आम्ही जिद्दीने प्रचार केला आणि लोकांपर्यंत पोहोचलो. सत्ताधारी पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवत नसला तरी, आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवल्या. जर लोकांनी मतदान जर इव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचा महापौर होईल. यांच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे, म्हणून ते खात्रीने सांगतात की १४०-१२५ जागांवर जिंकतोय”, असं संजय राऊत म्हणाले. “मुंबईला वाचवण्याकरता जे जे सोबत येतील त्यांना सोबत घेतलं जाईल. ते पक्ष स्वत:हून सोबत येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केलं आहे.






