वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकही अर्ज दाखल न झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले (फोटो ो- सोशल मीडिया)
Local Body Elections 2025: वडगाव मावळ : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूका (Maharshtra Elections) जाहीर झाल्या असून नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. वडगावमध्येही नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, आजपर्यंत म्हणजेच १३ नोव्हेंबरपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे वडगावच्या राजकारणात (Political News) उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांकडून मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये नगराध्यक्षपद तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. कोणाला अधिकृत उमेदवारी मिळणार आणि कोणाला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याच कारणामुळे अनेक इच्छुक सध्या प्रतीक्षेत आहेत. पक्षांतर्गत गटबाजी, मतभेद आणि नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे अर्ज दाखल करण्यात विलंब होत असल्याचे चित्र आहे. पक्षाची अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत उमेदवारांनी अर्ज भरणे टाळले आहे. त्यामुळे “गॅसवर” असलेले अनेक इच्छुक शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून एकूण १७ प्रभागांसाठी २४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी सुरु असून, उमेदवारांना अर्ज सादर करताना आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजकीय वर्तुळात सध्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या हालचालींना वेग आला आहे. काही संभाव्य उमेदवारांनी आपले प्रचार कार्यालय सुरू केले आहेत, तर काहींनी गटबाजी टाळण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. दोन्ही पक्षांत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून, उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय निरीक्षकांच्या मते, “वडगाव नगरपंचायतीची निवडणूक ही या वेळी अत्यंत चुरशीची होणार आहे. स्थानिक प्रश्न, नगराध्यक्ष पदावरील संघर्ष आणि पाणीसारख्या मूलभूत मुद्द्यांवर प्रचार रंगणार आहे. पक्षांतर्गत असलेली नाराजी शेवटच्या क्षणी समीकरणे बदलू शकते,” असे मत व्यक्त केले जात आहे.
एकूणच, वडगाव नगरपंचायतीची निवडणूक सध्या ‘थांबा आणि बघा’ अशा अवस्थेत पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ, पक्षांचे अधिकृत उमेदवार जाहीर होणे आणि त्यानंतरचे राजकीय समीकरण — यावर वडगावच्या निवडणुकीचा रंग ठरवणार आहे.






