"देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं," मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा भडकले!
मनोज जरांगे पाटील आज (१५ मे) जालन्यात बोलत असताना मराठा आरक्षण मुद्द्यावरून राज्यसरकारवार चांगलेच ताशेरे ओढले. सातारा गॅझेटचा जीआर एक महिन्यात काढण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ज्यांना कुणबी पुरावा सापडला त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही, तसेच शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
रुपाली चाकणकरांच्या अशोक खरातसोबतच्या फोटोवरून अंजली दमानिया भडकल्या, SIT कडून चौकशीची मागणी
यावेळी बोलत असताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “फडणवीसांकडून मराठा समाजाला जास्तीत जास्त त्रास देण्याचे काम चालू आहे. यांना मत आणि नेते मराठयांचे लागतात, पण मराठा समाजातील मुलं मोठी होऊ नये अशी त्यांची भूमिका दिसते,” असे ते यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आंदोलन झाल्यानंतर हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यावेळी सरकारच कौतुक केलं होत, त्यानंतर १०८ प्रमाणपत्रांचे वितरण झाले. मात्र सातारा गॅझेटबाबत दिलेलं आश्वासन अजून पूर्ण झालेलं नाही. आता आम्ही पाहतोच हा जीआर कसा निघत नाही,” अश्या शब्दात त्यांनी राज्य सरकारला सज्जड दम दिला आहे.
ते पुढे म्हणाले, “अनेक मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडूनसुद्धा संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीयेत. त्यामुळे अनेक मराठा कुटुंबे अडचणीत आली आहेत. शिंदे समिती रेकॉर्ड शोधण्याच्या प्रक्रियेत अपेक्षित गती नसल्याने समाजात नाराजी वाढत चालली आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचे स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचं स्पष्ट करत जरंगे पाटील यांनी येत्या शनिवारी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली जाईल हे स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारला भावनिक आवाहन करत ,” आमची लेकरं सोन्यासारखी आहेत, सरकारने आणखी बळी घेऊ नयेत,” असे सांगितले आहे.






