'संजय राऊत हेच खरे गद्दार, त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली'; राज्यातील 'या' कॅबिनेटमंत्र्याचा गंभीर आरोप (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यावरच आता कॅबिनेटमंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राऊत यांच्यावर ‘सर्वात मोठा गद्दार’ असल्याचा थेट आरोप केला आहे.
दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा फोटो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी जाहिरातीमध्ये ठेवण्यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला, असा आरोप करत ‘ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा राष्ट्रीय कट’ असल्याचे म्हटले. या वक्तव्याला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राऊत यांच्यावर ‘सर्वात मोठा गद्दार’ असल्याचा थेट आरोप केला आहे.
हेदेखील वाचा : Sanjay Raut : “आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर….”, संजय राऊतांविरोधात ठाण्यात आंदोलन
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघेंचा फोटो लावून तुम्ही काय साध्य करताय? अशा पद्धतीने ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा हा राष्ट्रीय कट आहे.’ त्यांनी पुढे म्हटले, ‘आनंद दिघेंचा पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतोय. शिंदे गट ज्या जाहिराती करतो त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नखाएवढाही नाही. बाळासाहेबांच्या बाजूला आणखी एक फोटो लावणे हा एक राष्ट्रीय कट आहे, असे राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे गटाचे नेते
बाळासाहेबांचे महत्व कमी करण्यासाठी तुम्ही या गोष्टी करताय हे जनता लक्षात ठेवते. तसेच, एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेंद्र मोदी असून बाळासाहेब ठाकरे नाहीत, असा टोला राऊत यांनी लगावला. या वक्तव्याने ठाणे शहरात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आनंद दिघे हे ठाण्याचे शिवसेनेचे संस्थापक नेते मानले जातात आणि त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या शेजारी ठेवणे हे आदरसूचक असल्याचे सांगितले जाते. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तर राऊत यांना ‘घरात घुसून मारण्याचा’ इशारा देत संताप व्यक्त केला.
संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली
शंभूराज देसाई यांनी राऊत यांना चांगलाच समाचार घेतला. ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात भगवा फडकवला, त्यावेळी आनंद दिघे यांच्या कामाचे कौतुक केले होते. त्याचे काही व्हिडिओ अजूनही माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत. बाळासाहेब ठाकरे जे बोलले ते संजय राऊत यांना मान्य नाही का ? एवढे संजय राऊत मोठे लागून गेले का? संजय राऊत हेच सर्वात मोठे गद्दार आहेत. भाजप महायुतीतून निवडून येऊनही त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रवृत्त केले, असा गंभीर आरोतच मंत्री देसाई यांनी केला.