फोटो सौजन्य- सोशल मीडिया
सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले होते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत. त्यांना अपेक्षित असलेले काम आपण सर्वांनी केले पाहिजे.भिसे कुटुंबीय आणि सत्यविजय भिसे मित्रमंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा स्मृतिदिन साजरा करीत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
शिवडाव येथे सत्यविजय भिसे यांचा आज २२ वा. स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.त्यात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच वारकरी संप्रदायातील ५० वारकऱ्यांचा शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, कै. सत्यविजय भिसे यांचा राजकारण आणि समाजकारणात असलेला नावलौकीक काही अपप्रवृत्तींना मान्य नसल्याने त्या अपप्रवृत्तीने कै. सत्यविजय भिसे यांची हत्या केली.त्या अपप्रवृत्तीला नियतीने धडा शिकवला. आज सत्यविजय भिसे जिवंत असते तर जिल्ह्याच्या राजकारणात अग्रस्थानी असले असते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा भिसे कुटूंबिय आणि मित्रमंडळ जपत आहे. तरुणपिढीने देखील त्यांचा समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे आहे. असे सांगितले.यावेळी माजी जि.प.सदस्य बाळा भिसे, शंकर पार्सेकर, दिनेश नाडकर्णी, रंजन चिके, शिवडाव सरपंच नितीश भिसे, उपसरपंच सायली तेली, विलास गावकर आदी उपस्थित होते.
बबन साळगावकरांनी भिसे प्रकरणात दिपक केसरकरांवर केले होते गंभीर आरोप
सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसेना नेते बबन साळगावकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर राजन तेली यांचे नाव सत्यविजय भिसे खून प्रकरणात गोवले असा आरोप हल्लीच केला होता. ते म्हणाले होते की, “दीपक केसरकर प्रत्येक निवडणुकीत अपप्रवृतीबद्दल बोलतात. दीपक केसरकर यांनी अनेक वेळा पक्ष बदलले आहेत आणि प्रत्येकाला दगा दिला आहे. सत्यविजय भिसे खून प्रकरणात राजन तेलींना मंत्री दीपक केसरकर यांनी तत्कालिन गृहमंत्री छगन भुजबळ यांना फोन करून आरोपी केले होते. दीपक केसरकर हे वारंवार मंत्री भुजबळ यांना वारंवार या प्रकरणात राजन तेली यांचे गुतंवा असे सांगत होते. त्यामुळे तेली नाहक जेलमध्ये गेले. तेली कसे गुंतले याचा मी साक्षीदार आहे. प्रत्येकाला जेलमध्ये टाकेन असे म्हणणारे दीपक केसरकर एक दिवस स्वत: जेलमध्ये जातील.”