मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीमुळे महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Mahavikas Aghadi broke : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका या स्वबळावर लढण्याचा नारा हा राज्यातील पक्षांकडून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या अंतर्गत गटबाजी सुरु असल्याचे दिसून येत असून यामध्ये कॉंग्रेस पक्ष एकटा पडल्याचे देखील दिसत आहे.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू हे एकत्रित आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह मराठी भाषेसाठी एकाच मंचावर आले. कोणताही झेंडा नाही आणि अजेंठा नाही म्हणत दोन्ही नेते एकत्रित आले असले तरी ही नवीन युतीची नांदी असल्याचे दिसून येत आहे. मराठीच्या मुद्द्यांवरुन एकत्रित विजयी सभा पार पडल्यानंतर मीरा भाईंदर येथे मोर्चामध्ये देखील ठाकरे गट व मनसे एकत्र आल्याचे दिसून आले. तसेच आझाद मैदानावर झालेल्या गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्ये देखील दोन्ही पक्षांनी पाठिंबा दाखवला होता. त्यामुळे आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये राजकीय मते जुळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उद्धव-राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची देखील उपस्थिती होती. शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी हाताला धरुन अमित-आदित्य ठाकरे यांना एकत्रित मंचावर नेत काकांशेजारी उभे केले. तसेच जितेंद्र आव्हाड हे देखील विजयी मेळाव्यामध्ये दिसून आले. मात्र यामध्ये कुठेही कॉंग्रेसचा सहभाग दिसून आलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही मोर्चा किंवा भूमिकेला कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचे देखील दिसले नाही. यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसकडे पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे.
आगामी निवडणूका या स्वबळावर लढण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘जेव्हा राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रात एक प्रचंड जल्लोष झाला. त्याच्यानंतर अनेकांना प्रश्न पडला यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे भविष्य काय त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की, इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी होती. महाविकास आघाडी ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली आघाडी होती,” असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी मनसेसोबत युतीबाबत सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढतील काय, त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणे असतात, त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं कधी स्थानिक आघाडी करावी लागते मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकच सांगितलं आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव या संदर्भात भविष्यात चर्चा होतील,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस पक्ष एकटा पडला असल्याचे दिसून येत आहे.