दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकत्र बसल्यामुळे संजय राऊत आक्रमक (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : नवी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. राजधानी दिल्लीमध्ये सुरु असलेल्या या मराठी साहित्य संमेलनामध्ये शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले होते. मोदी आणि शरद पवार यांच्यामधील राजकीय ऋणानुबंध दिसून आले. मात्र यावरुन आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना पंतप्रधान मोदी भटकती आत्मा बोलले होते याची आठवण करुन दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी मराठी साहित्य संमेलनामधील राजकीय प्रभाव असल्यावर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन सुरु झाले. काही लोकांचा अट्टहास असतो राजकारण्यासोबत त्यांना संमेलन कराये असते. परंतु माझी अपेक्षा राजकारण्यांशिवाय संमेलन करावे, अशी आहे. महाराष्ट्रावर मराठी माणसावर देशावर अडचणी आल्या तेव्हा कोणत्याही मराठी साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही. साहित्यिकांनी भूमिका मांडल्या नाही, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार एकत्र आले. त्यावर राऊत यांनी टीका केली. संजय राऊत यांनी पंतप्रधानांनी शरद पवारांवर केलेली टीकेचा उच्चार केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रवर, मराठी माणसांवर, देशावर जेव्हा संकट आले तेव्हा मराठी साहित्यिक आणि कलाकारांनी आवाज उठवला नाही. भूमिका कधीच घेतल्या नाही. अलीकडे साहित्यिक आणि कलवतांनी भूमिका घेणे बंद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती. त्यामुळे त्या भटकती आत्मास पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांच्या शेजारी कसे बसू दिले? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. राऊत म्हणाले की, मोदी यांच्या भाषणांत जो मी आहे तो अत्यंत घातक आहे,” असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “साहित्य संमेलानाच्या व्यासपीठावर राजकारण झाले. काही लोकांचा साहित्य संमेलनात राजकारण करण्याचा अट्टाहास असतो. साहित्यिकांनी एखादे संमेलन राजकारण्यांशिवाय करावे. पंडित नेहरू यांच्या काळात हे चित्र नव्हते. मराठी भाषेला अभिजात दर्जा विधानसभेच्या निवडणुकींआधी दिला. शरद पवार मोदी यांच्या बाजूला आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत आहेत. तिन्ही नेते दिल्लीत आहेत. त्यांनी बेळगावचा वाद सोडवला पाहिजे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोदी यांची भेट घेऊन हा वाद सोडवला पाहिजे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यामुळे टीका केली होती. शरद पवार यांनी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आणि कौतुक केले होते. यामुळे ठाकरे गट नाराज झाला होता. संजय राऊत यांनी हे दिल्लीचे राजकारण आम्ही देखील जाणतो असे म्हणत शरद पवार यांना टोला लगावला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बसल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.