राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसोबत युती करण्याबाबत वक्तव्य केले (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामुळे ठाकरे आणि पवार कुटुंब चर्चेमध्ये आले आहे. नाराजी विसरुन राज-उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. तर अजित पवार व शरद पवार यांच्या पक्षाचे एकत्रिकरण होईल अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचा आज (दि.10) वर्धापन दिन साजरा केला जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे दोन वर्धापन दिन मेळावे घेतले जात आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबत युती होणार की नाही याबाबत देखील मत मांडले आहे. अजित पवार आणि मी कुटुंब म्हणून नेहमी एकत्र असल्याचे सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केले. तसेच हुंडाबळी महाराष्ट्र हवामान यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भरसभेमध्ये शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. तसेच तरुण आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याचे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “जयंत पाटील यांनी पत्र दिलेलं नाही किंवा राजीनामा दिलेला नाही. प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही. तर नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीचा प्रश्न येतोच कुठे? जयंत पाटील यांनी केवळ त्यांचा विचार मांडला. याबाबत पक्षात सविस्तर चर्चा होईल,” अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे किंवा कोणी कोणाबरोबर एकत्र जायचं, हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. मात्र या चर्चा कॅमेरावर होत नाहीत. माझा आणि अजित पवारांचा प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे. त्यामुळे त्यात अंतर येत नाही आणि पवार कुटुंब म्हणून कालही आणि आजही आम्ही एकत्रच आहोत. यात काही वाद नाही. पण हा बहीण भावाचा खेळ नाही. हे राजकारण आहे,” असे सूचक विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, “माझ्यावर आणि पवार कुटुंबीयावर झालेले संस्कार आहेत. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. राजकीय लाईन काही घ्यायची असेल तर दादाला आणि मला दोघांसाठी हा काही बहीण भावांचा खेळ नाही आणि भातुकलीचा खेळ नाही. हे राजकारण आहे. एकत्र येण्याबाबत जो काही निर्णय होईल, तो लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल,” असेही सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितले.